अंबरनाथ: अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रवासाची मोठी अडचण आता दूर झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या विद्यार्थ्यांसाठी ५० आसनी बस उपलब्ध करून देण्यात आली असून, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांच्या उपस्थितीत या बससेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
अंबरनाथमध्ये महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याने, सध्या चिखलोली येथील एका खासगी इमारतीत २०० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तर उल्हासनगर आणि कल्याण येथील रुग्णालयात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जावे लागते. प्रशिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना दररोज स्वखर्चाने उल्हासनगर आणि कल्याण येथील शासकीय रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. ही आर्थिक आणि प्रवासाची कसरत लक्षात घेऊन ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
अंबरनाथ शहरात दोन वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. दोन वर्षापूर्वी देश पातळीवरील पात्रता फेरी पार करून १०० विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर गेल्या वर्षातही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे सध्या २०० विद्यार्थी अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ही अंबरनाथकारांसाठी अभिमानाची बाब असली तरी विविध कारणांमुळे या महाविद्यालयाला आणि विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असले तरी महाविद्यालयाची स्वतःची इमारत अद्याप उभी राहिलेली नाही. या इमारतीच्या जागेचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत आहे. अंबरनाथ शहरात जिल्हा रुग्णालय आणि विशेषतः शस्त्रक्रिया होईल असे शासकीय रुग्णालय नसल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागणार आहे. नुकताच तसा करार करण्यात आला आहे. एकीकडे शिक्षण एका वास्तूत, प्रशिक्षण दुसऱ्या शहरात आणि निवासाची व्यवस्था दुसरीकडे अशा स्थितीत विद्यार्थ्यांना स्वखर्चाने प्रवास करावा लागत होता. याबाबत स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर यांना वाहतूक व्यवस्थेसाठी विनंती करण्यात आली होती. अखेर विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवारी शिवसेना आमदार डॉ. बालाजी कीणीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या बसची सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. ही बस आता दिवसभर चिखलोली कॉलेज ते अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणमधील विविध रुग्णालयांदरम्यान विद्यार्थ्यांची ने-आण करणार आहे. दरम्यान, येत्या चार महिन्यांत महाविद्यालयात तिसरी तुकडी दाखल होणार असून विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३०० वर पोहोचणार आहे. ही वाढती संख्या विचारात घेता, अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांनी प्रशासनाकडे आणखी २५ आसनी दोन बसेसची मागणी केली आहे. या अतिरिक्त बसेस लवकरच उपलब्ध झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर प्रशिक्षणासाठी पोहोचणे सोपे होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
