अंबरनाथः अंबरनाथ शहरातील फेरिवाल्यांवर गेल्या काही दिवसात नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे फेरिवाल्यांनी थेट नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकावरच धावून जात धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात फेरिवाल्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही फेरिवाल्यांची अशीच मुजोरी दिसून आली होती.

गेल्या काही वर्षात अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातील पूर्व भागात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरिवाल्यांचे बस्ताव वाढल्याचे दिसून आले आहे. रेल्वे स्थानकाच्या शेजारचा हा चौक सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. या भागात रिक्षा, फेरिवाले, बाजारपेठेत येणारी वाहने आणि नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे येथून सायंकाळच्या वेळी मार्ग काढणे जिकरीचे ठरते. त्यात फेरिवाले थेट रस्त्यावर आपले बस्तान मांडतात. ग्राहक थांबल्याने गर्दीत भर पडते. परिणामी पादचाऱ्यांना चालणेही कठिण होते.

कोविड काळापासून या फेरिवाल्यांची संख्या वाढली आहे. त्यात काही रिक्षाचालकांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना करोना काळात टाळेबंदी दरम्यान येथे जागा व्यापण्याला मदत केली. आता हेच जागा व्यापणारे व्यक्ती ही जागा फेरिवाल्यांना भाडेतत्वावर देत असल्याची चर्चा रंगली आहे. पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या फेरिवाले आणि तथाकथित जागेचे मालक आता नगर परिषद कर्मचाऱ्यांवरच धावून जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.

मंगळवारी अशाच कारवाईवेळी काही फेरिवाले नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. कर्मचाऱ्यांना फेरिवाल्यांनी धक्काबुक्कीही केली अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या सूचनेनंतर कर्माचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी आता होते आहे.

कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा इतिहास

यापूर्वीही अंबरनाथ नगर परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात हल्ल्याचा प्रकार घडला होता. तर सहा वर्षांपूर्वी अतिक्रमण कारवाईचे सत्र सुरू असताना फेब्रुवारी २०१९ मध्ये अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांच्या वाहनावर थेट ऍसिड हल्ला करण्यापर्यंत मजल गेली होती. याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता.