अंबरनाथ: गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि त्यातच विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या अंबरनाथ आणि हिललाईन पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारतींचा वनवास अखेर संपला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुरुवारी कोणत्याही बडेजावाविना अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीत सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय आणि पोलिस ठाण्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. जीर्ण आणि धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत धरून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अखेर या अत्याधुनिक, सुसज्ज इमारतीत प्रवेश केल्याने त्यांच्यात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील कल्याण-बदलापूर रस्त्यालगत असलेल्या अंबरनाथ पोलिस ठाण्याची जुनी इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली होती. पावसाळ्यात या इमारतीची दुरवस्था अधिकच गंभीर व्हायची. अशीच काहीशी अवस्था उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्याचीही झाली होती. पोलिसांची ही गैरसोय पाहून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यातून गृह विभागाकडून या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या पुनर्विकासासाठी प्रत्येकी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, तात्पुरत्या जागेत कारभार हलवून दोन वर्षांपूर्वी या दोन्ही भव्य आणि सुसज्ज इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले होते.
काही महिन्यांपूर्वीच या दोन्ही इमारतींचे काम पूर्ण झाले होते. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नव्हता. त्यातच विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा मुहूर्त आणखी दीड महिना लांबणीवर पडला. या राजकीय दिरंगाईमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र अपुऱ्या जागेत आणि मोठ्या गैरसोयीचा सामना करत काम करावे लागत होते. अखेर, आचारसंहितेचा अडसर आणि कर्मचाऱ्यांची होणारी कोंडी पाहता, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आणि गुरुवारी अंबरनाथ पोलिस ठाण्याने आपल्या नवीन वास्तूत अधिकृतपणे पाऊल ठेवून कामाला सुरुवात केली.
अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या या नवीन इमारतीची रचना पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित करण्यात आली आहे. या इमारतीवर स्वतंत्र सुर्यउर्जा यंत्रणा आणि पर्जन्यजल संवर्धन यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली असून, अखंडित वीज पुरवठ्यासाठी १०० किलोव्हॅटचे स्वतंत्र रोहित्र आणि उच्चदाब जनरेटरची व्यवस्था आहे. तसेच संपूर्ण इमारत सीसीटीव्ही कॅमेरे आणि अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेने सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, तर पोलिसांसाठी विश्रांती कक्ष आणि सुविधा खोल्या उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध बैठका आणि कार्यक्रमांसाठी ५० नागरिकांच्या क्षमतेची दोन भव्य सभागृहे येथे उपलब्ध आहेत.
वाहतूक विभागाला हक्काची जागा
पोलिस ठाण्याच्या या स्थलांतरामुळे अंबरनाथ वाहतूक विभागाचाही मोठा प्रश्न सुटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ वाहतूक पोलिसांचा कारभार एका जीर्ण पोलिस वसाहतीमधील लहानशा खोलीतून चालवला जात आहे. आता अंबरनाथ पोलिस ठाणे नवीन इमारतीत गेल्यामुळे, त्यांच्या जुन्या पर्यायी इमारतीचा ताबा वाहतूक विभागाला दिला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही लवकरच हक्काची आणि प्रशस्त जागा मिळणार असल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. एकूणच, कोणत्याही भव्य सोहळ्याविना का होईना, पण पोलिसांना हक्काची आणि सुरक्षित जागा मिळाल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
