अंबरनाथ: अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारापासून ते लोकनगरीपर्यंतच्या हद्दीत बेसुमार पद्धतीने उभारलेल्या व्यावसायिक अतिक्रमणांवर अंबरनाथ नगरपालिकेने गेल्या दोन वर्षांत तिसऱ्यांदा कारवाईची नोटीस बजावली आहे. मात्र, गाळेधारक आणि जमीन मालकांचे वजन आणि राजकीय दबावामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ नोटीस देण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे, यावेळी तरी पालिका ही अतिक्रमणे हटवण्याची धमक दाखवणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील पूर्व आणि पश्चिम भागात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

विशेषतः अंबरनाथ-काटई राज्य महामार्गावरून शहरात प्रवेश करताना पाटील पेट्रोल पंप ते लोकनगरीपर्यंत खासगी जागेवर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो व्यावसायिक गाळे उभे राहिले आहेत. येथील हॉटेल्स आणि दुकानांमधून खरेदीसाठी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात आणि नियमित वाहतूक कोंडी होते. त्यामुळे, नागरिकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवर संतप्त सवाल उपस्थित केला आहे. आधीच हा रस्ता वळणावळणाचा असल्याने येथे वाहनांचा वेग कमी असतो. त्यात बेकायदा पार्किंगमुळे रस्त्यात अडचणी येतात.

या अतिक्रमणांविरोधात पालिकेने यापूर्वी दोन वेळा कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु गाळेधारक आणि जमीन मालकांनी कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांना विरोध करणे, धमकावणे आणि नोटीसा फाडून टाकण्याचे प्रयत्न केले, अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत दिली आहे. तसेच, अनेकदा राजकीय दबावामुळेही ही कारवाई टाळावी लागल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर, पालिकेने नुकतीच या मार्गावरील ६० ते ७० अतिक्रमणांना पुन्हा एकदा कारवाईची नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी येत्या आठ दिवसांत या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. शहराच्या सुशोभिकरणाच्या गप्पा मारणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शहराच्या प्रवेशद्वारावरील या बेसुमार अतिक्रमणांकडे उदासीन असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे, त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे, स्थानिक दहशत आणि राजकीय दबाव झुगारून पालिका खरोखर हा परिसर मोकळा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

असमान रस्त्यामुळेही वाहतूक संथ गतीने

अंबरनाथच्या पूर्व भागातील आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर चौकात असमान रस्त्यामुळे कोंडी होते. येथे रस्त्याला पडलेले खड्डे, असमान रस्ता, मध्ये काँक्रीटमध्ये आलेले खाचखळगे वाहतुकीचा वेग मंदावतात. शेजारी असलेले गॅरेज, त्यांची उभी केली जाणारी वाहने, हवा भरण्याच्या दुकानाबाहेर उभी केली जाणारी वाहने यामुळे भर चौकात कोंडी होती. सिग्नल सुटल्यानंतर वाहने काढताना याचा फटका बसतो.