ठाणे: जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात उद्योगांच्या उभारणीसाठी आता प्रक्रिया केलेले सांडपाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सिडको आणि खाजगी विकासक यांच्यात होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय करारामुळे ‘लोढा इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक पार्क’ आणि ‘ॲमेझॉन डेटा सर्व्हिसेस’च्या प्रकल्पांना पाणी मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. सिडकोच्या प्रक्रिया केंद्रातून दररोज ११४ दशलक्ष लिटर द्वितीय प्रक्रिया केलेले सांडपाणी या प्रकल्पांना पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे येथे रोजगार निर्मितीला बळ मिळणार आहे.
राज्यात एकीकडे वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना शासकीय यंत्रणांची दमछाक होत असते. त्यात उद्योगांसाठी बांधलेल्या धरणाचे पाणीही गरज म्हणून नागरी वसाहतींना देण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल असतो. त्यामुळे उद्योगांना त्याचा फटका बसतो. मात्र नागरी वस्त्यांमधील सांडपाणी द्वितीय प्रक्रिया करून उद्योगांना वापरण्यासाठी आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भात एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.
मे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (लोढा) यांच्या वतीने अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेण आणि असोडे येथे एक विशाल एकात्मिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क विकसित केले जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात मोठी गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच परिसरातील भूखंडावर ‘मे. ॲमेझॉन डेटा सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.’ यांचाही प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पांच्या गरजेनुसार सिडकोमार्फत एकूण ११४ दशलक्ष लिटर पाणी दररोज उपलब्ध करून दिले जाईल. त्यानुसार लोढा लॉजिस्टिक पार्क यांना ९४ दशलक्ष लिटर प्रतिदिन तर ॲमेझॉन डेटा सर्व्हिसेस २० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवले जाईल.
या प्रकल्पासाठी सिडकोच्या कळंबोली सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून पाणी आणले जाणार आहे. हे पाणी एमआयडीसीच्या तळोजा औद्योगिक क्षेत्रामार्गे पाइपलाइनद्वारे अंबरनाथमधील प्रकल्पांपर्यंत पोहोचवले जाईल. या प्रकल्पाचा संपूर्ण पायाभूत सुविधा खर्च, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी मे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा) यांनी उचलली आहे. सुरुवातीला हा करार २०२८ ते २०३३ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी पर्यंत करण्यात येणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा वापर कमी करून, सांडपाण्यावर प्रक्रिया करून द्वितीय स्तरीय प्रक्रिया केलेले सांडपाणी उद्योगांसाठी वापरण्याचा हा प्रयत्न पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. एमआयडीसीने या प्रकल्पासाठी भांडवली अंशदान तत्त्वावर संमती दिली असून, सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या प्रस्तावाला एमआयडीसीच्या ४१० व्या सदस्य मंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते.
