मुसळधार पावसामुळे राज्यमार्गावर एक फुटापर्यंत पाणी, वाहतूक विस्कळीत
कल्याण आणि बदलापूर या शहरांना जोडणारा राज्यमार्ग पुन्हा एकदा तुंबला. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यमार्गावरील अंबरनाथ शहरातील पश्चिमेचा मोठा भाग पाण्याखाली गेला. या राज्यमार्गावर असलेल्या ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या परिसरात एक फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण बदलापूर राज्यमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कल्याण, उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून हा राज्यमार्ग जातो. कल्याणसारखे तालुक्याचे ठिकाण, उल्हासनगरसारखे व्यापारी शहर, अंबरनाथ सारखे औद्योगिक शहर आणि बदलापूर या मार्गाने जोडले जाते. याच मार्गावरून मुरबाड आणि कर्जतला जाणे सोयीचे ठरते. या राज्यमार्गाची उभारणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हा राज्यमार्ग सहा पदरी केला जातो आहे. बहुतांश भागात या राज्य मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था या राज्यावर मार्गावर उभारण्यात आली नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही मिनिट पडलेल्या या पावसामुळे कल्याण बदलापूर राज्य मार्गावर पुन्हा एकदा पाणी साचले. अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या भागात सुमारे एक फुटापर्यंत पाणी साचले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath kalyan badlapur state road again under water in monsoon amy
First published on: 01-07-2022 at 18:41 IST