अंबरनाथ: अंबरनाथ-काटई मार्गावरील आनंद नगर ते टी-जंक्शन या अत्यंत वर्दळीच्या टप्प्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बुधवारी सायंकाळीही या मार्गावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. टी-जंक्शन ते थेट आनंद नगरच्या पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, या कोंडीच्या काळात वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने बेशिस्त वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने दामटवल्याने या मार्गावरील दोन्ही मार्गिका पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या.

बदलापूर ते काटई हा मार्ग सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या या मार्गावर दररोज सायंकाळी कोंडीची परिस्थिती उद्भवत आहे. आनंदनगर औद्योगिक वसाहतीतून अनेक अवजड वाहने वाहतूक करतात. आनंदनगरच्या पोलीस चौकीशेजारी, पुढे कृष्णा पॅलेस हॉटेलजवळ, पुढे पिंकसीटीपूर्वीच्या उजवीकडचे वळण या तीन ठिकाणाहून मुख्य रस्त्यावरून अवजड वाहतून औद्योगिक वसाहतीत प्रवेश करते. येथून येणारी अवजड वाहने, सायंकाळच्या सुमारास कामगारांची वाहने यांची संख्या वाढते. मुख्य रस्त्यावर येण्याच्या नादात अनेक वाहने दामटवली जातात. त्यामुळे येथे मोठी वाहतून कोंडी होते. या कोंडीतून लवकर बाहेर पडण्याच्या नादात अनेक वाहनचालक कोणत्याही दिशेने, वाट मिळेल तिथून वाहने घुसवण्याचा प्रयत्न करतात. या बेशिस्तपणामुळे आणि लेन कटिंगमुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी अधिकच जटील होत असून, ती सुरळीत होण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे. या संपूर्ण गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी या महत्त्वाच्या चौकात आणि मार्गावर वाहतूक पोलीस तैनात असणे अत्यंत गरजेचे असताना, ऐन गर्दीच्या वेळी त्यांची असणारी अनुपस्थिती वाहनचालकांसाठी अधिकच मनस्तापाची ठरत आहे.

बुधवारी सायंकाळी सहानंतर अशाच प्रकारची वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरापर्यंत या कोंडीचा फटका वाहतुकीला बसला. या रोजच्या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातून काम संपवून घरी परतणाऱ्या हजारो कामगारांना आणि नोकरदारांना बसत आहे. सायंकाळी सुटण्याच्या वेळी कंपनीच्या बसेस, सार्वजनिक वाहतुकीची वाहने आणि खाजगी वाहने या कोंडीत तासनतास अडकून पडत आहेत. कोंडीमुळे वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने आणि प्रवासातच मोठा वेळ वाया जात असल्याने अनेक नागरिकांना घरी पोहोचण्यास उशीर होत आहे. दिवसभर काम करून थकलेले कामगार या वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन आनंद नगर ते टी-जंक्शन या मार्गावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करावेत आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी आता अडकलेल्या प्रवाशांकडून केली जात आहे.