अंबरनाथः अंबरनाथ ते काटई दरम्यान नेवाळीजवळ डावलपाडा येथील रस्त्यांची यंदाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे, त्यातून वाहणारे पाणी, त्यामुळे वाहनांचा मंदावलेला वेग या सर्वांमुळे येथील वाहतूक दररोज विस्कळीत होत असून त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याच मार्गावर नेवाळी चौकातही कोंडी होते. त्यामुळे ही वाहनांची रांग वाढत जाऊन वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागते आहे.
बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरहून ठाणे, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबईला जाण्यासाठी सर्वात महत्वाचा रस्ता अंबरनाथ काटई रस्ता आहे. या रस्त्याचे गेल्या काही वर्षात कॉंक्रिटीकरण आणि रूंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचा बहुतांश भाग कॉंक्रिटचा झाला आहे. त्यामुळे काही भागात वाहतूक वेगवान झाला आहे. मात्र या मार्गातील नेवाळीजवळचा महत्वाचा भाग गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाण्यासाठी आणि या मार्गावर जलवाहिन्या टाकण्यासाठी या मार्गाची जबाबदारी १९७२ साली घेतली होती. तेव्हापासून हा मार्ग महामंडळाच्या अखत्यारित आहे. या मार्गावर डावलपाडा भागात रस्त्याचा काही भाग भूसंपादनातील घोळामुळे कॉंक्रिटीकरणापासून वंचित राहिला. याच भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जलवाहिनीचे कामही केले. मात्र भूसंपादन झालेल्या जमिनीच्या नोंदीतील घोळामुळे स्थानिका शेतकऱ्याने आक्षेप घेत येथे कॉंक्रिटीकरणाच्या कामाला विरोध केला.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. येथे मोठमोठे खड्डे पडल्याने काटईकडे जाणारी मार्गिका व्यापली जाते. परिणामी उलट्या मार्गिकेतून वाहने वळवावी लागतात. त्यामुळे दोन्ही मार्गिकांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. पावसाळ्यात खड्डे आणि त्यात ही वळवलेली वाहतूक यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. नेवाळी चौकात वाहतुकीला शिस्त नसल्याने सातत्याने कोंडी होते. त्यामुळे नेवाळी चौक ते डावळपाडा भागातील हा पट्टा कायमच कोंडीत असतो.
गेल्या काही दिवसांपासून या भागातील कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाहनचालकांना ऐन सकाळच्यावेळी उशिर होत असतो. दुचाकीस्वारांचे या खड्ड्यांमुळे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
प्रतिक्रियाः दरवर्षी या भागातील रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे कार्यालयात जाण्यास उशिर होतो, परतीलाही तसाच उशिर होतो. खड्ड्यांमुळे आणि तासनतास दुचाकीवर बसल्याने शारिरीक त्रास होतो तो वेगळाच आहे.
- अक्षय राठोड, प्रवासी.
