अंबरनाथ : अंबरनाथ शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. शहरातील प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, मंगळवारी अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मी नगर चौक परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ११ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे

वडवली हजेरी आणि ग्रीन सिटी हजेरी शेड अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेच्या विशेष पथकाने महालक्ष्मी नगर परिसरातील विविध दुकानांची अचानक तपासणी केली. या तपासणीत काही दुकानदारांकडे शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. पथकाने तातडीने कारवाई करत हा सुमारे ११ किलो वजनाचा प्लास्टिकचा साठा जप्त केला. केवळ कारवाई करून न थांबता, यापुढे कोणत्याही दुकानदाराने प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर, विक्री आणि साठवणूक करू नये, अन्यथा नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दुकानदारांना देण्यात आली. अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशान्वये ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये नगरपरिषदेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक संदीप खोजे, स्वच्छता निरीक्षक जयंत कल्याणकर यांच्यासह मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एकीकडे कारवाई, दुसरीकडे प्लास्टीक वापर सुरूच

शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी केवळ प्रशासनाची कारवाई पुरेशी नसून सर्वसामान्यांचा सहभागही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा. बाजारात जाताना पर्यावरणपूरक अशा कापडी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचाच वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. असे असले तरी एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे अनेक दुकानांमध्ये आजही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच होता. त्यामुळे सातत्यपूर्ण कारवाईची गरज व्यक्त होत आहे.