अंबरनाथ: अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि अंबर भरारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील बाळ कोल्हटकर रंगमंचावर झालेल्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवात ‘आदिशेष’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना त्यांच्या दीर्घ व उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक असल्याचे जीवनगौरव स्वीकारताना विजय गोखले म्हणाले. माझे गुरू भाषाप्रभू बाळ कोल्हटकर यांच्या नावाच्या रंगमंचावर माझ्या आयुष्यातील पहिला जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद आणि समाधान वाटत आहे. यावेळी त्यांनी ‘वाहतो ही दुर्वांची जोडी’ या अजरामर नाटकातील काही काव्यपंक्ती सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.
‘गुलकंद’ आणि ‘सकाळ तर होऊ द्या’ला पसंती
‘गुलकंद’ या चित्रपटासाठी सचिन गोस्वामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाने अभिनय विभागात विशेष छाप सोडली. महोत्सवात अभिनय, दिग्दर्शन, संगीत, तांत्रिक विभाग अशा विविध श्रेणींमध्ये ५० हून अधिक पारितोषिके प्रदान करण्यात आली.
तांत्रिक विभागांनाही न्याय
नामवंत कलाकारांबरोबरच रंगभूषा, वेशभूषा यांसारख्या तांत्रिक विभागांनाही पुरस्कार देण्यात आल्याबद्दल प्रकाश निमकर आणि अतुल सिधये यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे पडद्यामागील कलाकारांच्या योगदानालाही योग्य सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यास अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेते अरुण नलावडे, समीर चौगुले, प्रणव रावराणे, लेखक सचिन मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे आणि जगदीश हडप यांनी केले.
याशिवाय आमदार डॉ. बालाजी किणीकर, सुनील चौधरी, निखिल चौधरी, गुणवंत खेरोदिया, महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील, महेश सुभेदार, अभय शिंदे, डॉ. राहुल चौधरी, कुणाल चौधरी, अभिनेत्री इरावती लागू, दत्ता घावट आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवातील पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : आदिशेष
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून)
- सुबोध भावे – सकाळ तर होऊ द्या
- प्रणव राव राणे – आदिशेष
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मानसी नाईक – सकाळ तर होऊ द्या
- सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : भावलीचं लगीन
- सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट : गुलकंद
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : स्वप्निल बांदोडकर
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : समीर चौगुले – गुलकंद
- सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री : विशाखा सुभेदार – वेल्डन आई
- सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता : अरुण नलावडे – आदिशेष
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा : जयवंत वाडकर
- कारकीर्द गौरव पुरस्कार (रंगभूषा) : अतुल सिधये
- कारकीर्द सन्मान पुरस्कार (वेशभूषा) : प्रकाश निमकर

