अंबरनाथः अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रकार वाडले होते. पान टपऱ्यांच्या माध्यमातून याची विक्री होत असल्याचा संशय वाढला होता. यााबाबत तक्रारी वाढत असतानाच अंबरनाथ नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे अंबरनाथ शहरातील बेकायदा पान टपऱ्यांवर कारवाई केली आहे. कारवाईत या टपऱ्यांची मोडतोड करण्यात आली आहे. बदलापुरातही लवकरच ही कारवाई केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहरात अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. खुद्द पोलिस प्रशासन उघड्यावर, सार्वजनिक शौचालयांशेजारी, मोकळ्या जागांवर अनेक तरूणांना अमली पदार्थाचे सेवन करताना ताब्यात घेत होते. अंबरनाथ शहरात एकाच ठिकाणी पोलिसांनी दोनदा कारवाई करत विक्रीसाठी अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे रहिवासी भागात ही कारवाई करण्यात आली होती. तर त्याचवेळी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिमंडळ चारमधील शहरांमध्ये अमली पदार्थांचे आणि विशेषतः गांजाचे सेवन करत असलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे यात तरूणाई अधिक प्रमाणात गुंतल्याची बाब समोर आली होती.
अमली पदार्थ विक्री आणि सेवनाच्या घटना समोर येत असतानाच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना आजकाल पान टपऱ्यांवरही अमली पदार्थ सर्रासपणे विक्री होत असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या दाव्यानंतर परिमंडळ चार क्षेेत्रातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तर या बेकायदेशीर पान टपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी अंबरनाथ नगरपालिका आणि अंबरनाथ पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ शहरातील बेकायदा पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या पानटपऱ्या जमिनदोस्त करण्यात आला. दुपारी ४ वाजेपर्यंत विविध ठिकाणच्या १५ हून अधिक टपऱ्या जमिनदोस्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच यापुढेही ही कारवाई सुरूच राहणाऱ्या असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रियाः चहा आणि पान टपऱ्यांच्या आडून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही अशी कोणती अमली पदार्थाची विक्री दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. – सचिन गोरे, उपायुक्त, परिमंडळ चार, उल्हासनगर .