अंबरनाथः अंबरनाथ नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप युतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
गुरूवारी स्थानिक शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आमदार किणीकरांनी दिली. तर काँग्रेसही भाजपसोबत युतीची चाचपणी करत असल्याची माहिती आहे. भाजपही शिवसेनेसोबत युतीसाठी तयार आहे मात्र वाळेकरांना बाजूला ठेवून युती करावी, यासाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे आता शिंदेंच शिवसेना काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत धुळ चारली. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या. भाजपला नगराध्यक्ष पदावर संधी मिळाली असली अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदें) पक्षाला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासह पालिकेचा कारभार विनाव्यत्यय चालवण्यासाठी भाजपला इतर पक्षांसोबत जुळवून घ्यावे लागणार आहे.
राज्यात महापालिका निवडणुका एकत्र लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपने आता महायुतीची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आता अंबरनाथमध्येही भाजपसोबत जाण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने रस दाखवला आहे. त्याचेच फलित म्हणून नुकतीच स्थानिक शिवसेना आमदार बालाजी किणीकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. या बैठकीत निकालोत्तर युती करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आमदार किणीकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.
वरिष्ठांच्या सूचनांनुसार आम्ही भेट घेतली. त्यावर वरिष्ठच निर्णय घेतील मात्र आम्ही युतीसाठी अनुकूल आहोत, असेही किणीकर यांनी बोलताना सांगितले. यात युतीचे काही सत्तासुत्र मात्र अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे ही युती कोणच्या सुत्रावर होते ते अद्याप कळू शकलेले नाही.
वाळेकर बाजूला सारूनच युती
नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या मनिषा वाळेकर यांचा पराभव झाला. प्रचारात दोन्ही गटांनी खालची पातळी गाठली. मात्र आता शिवसेनेसोबत युती करण्यास आम्हाला हरकत नाही. पण वाळेकर यांना बाजूला ठेवूनच युती होईल, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
आम्हाला युतीबद्दल आनंदच आहे, पण ज्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युतीविरूद्ध काम केले त्यांच्यासोबत युती करू शकत नाही. त्यामुळे त्यांना बाजूला ठेवूनच युती होईल, याबाबत निवडणुकीपूर्वीही भूमिका घेतली होती. तीच भूमिका कायम आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नगरसेवक अभिजीत करंजुले यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेससोबतही चर्चा सुरू
दरम्यान, नैसर्गिक युतीमधल्या शिवसेना पक्षाशी चर्चा सुरू असतानाच अंबरनाथ शहरात १२ नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसही भाजपसोबत युतीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. गुरूवारी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. कोणत्याही अटीशिवाय आम्ही युतीसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया एका नवनिर्वाचीत काँग्रेस नगरसेवकांने दिली आहे. त्यामुळे भाजप प्लान बीवर काम करत असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे.
