अंबरनाथ: शहरात एकीकडे अनधिकृत फेरीवाले आणि वाढत्या वाहतूक कोंडीने नागरिक आधीच त्रस्त असताना, आता खुद्द अंबरनाथ नगरपालिकेकडूनच नागरिकांना वेठीस धरत रस्ते अडवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेकडून येत्या २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी भव्य आकाराच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या हुतात्मा चौकात चक्क वाहतुकीला अडथळा ठरणारा मंडप उभारण्यासाठी बांबू उभे करून प्रशासनानेच अपघातांना आमंत्रण दिले आहे. रस्ते मोकळे ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे अंबरनाथकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी पालिकेने उभारलेल्या या स्वागत कमानी अत्यंत निष्काळजीपणे आणि धोकादायक स्थितीत उभारल्या आहेत. हुतात्मा चौकातील मंडप व्यवस्थेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत असून, येथे वाहनांची कोंडी होत आहे. पूर्वेतील रेल्वे स्थानकाकडून हुतात्मा चौकात जाण्यासाठीचा रस्ता आधीच चढणीचा आहे. त्यात ऐन वळण घेण्याच्या ठिकाणी मांडवाचे खांब टाकण्यात आले आहेत. त्यामुळे येथून वाहने वळवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. तसेच येथून एक मार्ग कानसई भागातही जातो. त्याचाा मोठा भाग व्यापला गेला आहे. शेजारीच स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अशाच प्रकारे कमानी लावण्यात आल्या आहेत. आधीच वळणाच्या या रस्त्यावर कोंडी होत असते. पुढे शहरातील एकमेव बाह्यवळण रस्त्यावरही लोकनगरी स्मशानभूमीच्या अगदी समोर लोखंडी कमान उभारणयात आली आहे. या बाह्यवळण रस्त्यावरून वाहनाचा वेग मोठा असतो. आनंदनगर किंवा शिवाजीनगर भागातून शिवमंदिर, रेल्वे स्थानक, स्वामी समर्थ चौकाकडे जाताना येथे लावण्यात आलेली कमान अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते. विशेष म्हणजे या भागात यापूर्वीच अनेक अपघात झाले आहेत. या मार्गावर कमान बसवून पालिका स्वतःच अपघाताला आमंत्रण देत असल्यााचा आरोप होतो आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. राजकीय पुढारी आणि मंडळांनाही कमानी काढण्याचा विसरसार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता होऊन जवळपास आठवडा उलटूला आहे. मात्र, तरीही अंबरनाथमधील स्थानक परिसर आणि विस्तारित भागातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर गणेशोत्सवाचे मंडप आणि राजकीय पुढाऱ्यांच्या स्वागत कमानी तशाच उभ्या आहेत. सण संपल्यानंतर या कमानी तातडीने काढण्याचा विसर राजकीय नेते आणि सार्वजनिक मंडळांना पडला आहे.
शहरातील रस्ते आधीच अनधिकृत फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याने अरुंद झाले आहेत. त्यात या कमानी आणि मंडपांमुळे महिनाभरापासून नागरिकांना भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे.
