शिवसेनेकडून इतिवृत्तावर आक्षेप, भाजपकडून संताप व्यक्त लोकसत्ता प्रतिनिधी अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आता विकोपाला गेला असून, याचा थेट परिणाम नगर परिषदेच्या कारभारावर दिसून येतो आहे. गुरूवार, ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा इतिवृत्ताच्या वादावरून सलग तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आली.

पावसाळा तोंडावर असताना आरोग्य आणि नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाची कामे असलेली विशेष सभाही काही दिवसांपूर्वी तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या धोरणावर भाजपच्या वतीने टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक कोणत्या न कोणत्या कारणाने सभा तहकूब करत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने केला जातो आहे. गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच १३ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी इतिवृत्तावर तीव्र आक्षेप नोंदवला.

मागील सभेत उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, असा दावा करत त्यांनी हे मुद्दे घेतल्याशिवाय सभा पुढे चालू नये अशी मागणी लावून धरली. यावर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कायदेशीर गुंता टाळण्यासाठी काही संस्था आणि व्यक्तींची नावे वगळण्यात आली होती. सदस्यांची मागणी असल्यास त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले, मात्र शिवसेना नगरसेवक इतिवृत्त तत्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीवर ठाम राहिले.

सभागृहातील गोंधळ वाढल्यामुळे अखेर सभा सुरू ठेवायची की स्थगित करायची, यावर मतदान घेण्याची वेळ आली. यावेळी आपल्या संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, यापूर्वी २८ एप्रिल रोजी झालेली आरोग्याशी निगडित महत्त्वाची विशेष सभा देखील पत्रवाचनाच्या वादावरून शिवसेनेने तहकूब करण्यास भाग पाडले होते.

१३ मार्चच्या सभेतही भाजच्या प्रभागातील कामांना कात्री लावून शिवसेनेने केवळ आपल्या प्रभागातील कामांना मंजुरी दिली होती, ज्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. राजकीय कुरघोड्यांच्या या सत्रामुळे शहरातील नाले सफाई, रस्ते दुरुस्ती आणि आरोग्यविषयक कामे रखडली असून, त्याचा फटका शहराला बसेल असा आरोप भाजपचे गटनेते अभिजीत करंजुले यांनी केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पराभवाची सल अजुनही जात नसून त्यामुळे सातत्याने सभेचे कामकाज होऊ दिले जात नाही, असाही आरोप करंजुले यांनी केला.

छायाचित्र घेण्यावर आक्षेप ?

सभा तहकूब करायची की नाही यावर सभागृहात मतदान सुरू असताना भाजपच्या अभिजीत करंजुले यांनी मोबाईलमध्ये छायाचित्र काढल्याचा आरोप शिवसेनेच्या काही महिला नगरसेवकांनी केला. हा गुन्हा आहे असाही आरोप नगरसेवकांनी केला. मात्र अभिजीत करंजुले यांनी हे आरोप फेटाळले. ज्या सभेचे संपूर्ण चित्रिकरण होत असून माध्यमांच्या वतीनेही सभा बाहेर दाखवली जाते, अशावेळी हा अनावश्यक मुद्दा काढण्यावर करंजुले यांनी संताप व्यक्त केला. तसेच मी अध्यक्षांना मोबाईलही तपासायला देण्याची तयारी केली होती, असेही ते म्हणाले.