अंबरनाथः अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना आघाडीच्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने परिषदेतील सत्तासमीकरणे बदलणार असून शिवसेना आघाडीचा वरचष्मा राहणार आहे. परिणामी गेल्या पाच महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या भाजपच्या तेजश्री करंजुले आणि भाजप आघाडीला शिवसेनेशी जुळवून घेण्यापलिकडे पर्याय नसल्याची चर्चा आहे. विषय समित्यांच्या सभापतीपदासह एक स्विकृत सदस्यही शिवसेना आघाडीच्या पारड्यात पडणार आहे.

अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षा म्हणून थेट निवडून आल्या. मात्र भाजपच्या अवघ्या १४ जागी नगरसेवक निवडून आले. तर शिवसेनेचे २७, कॉंग्रेसचे १२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्ष ४, अपक्ष दोन असे नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष पदी विजय मिळवल्याने भाजपने वेगाने सुत्रे हलवत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला जवळ करत ३१ सदस्यांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. पराभवानंतर धक्क्यात असलेल्या शिवसेनेने उशिराने सुत्रे हलवली आणि भाजपच्या आघाडीत गेलेल्या चार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांना आपल्या आघाडीत ओढले. त्यानंतर शिवसेनेने उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. मात्र नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी पिठासीन अधिकारी म्हणून भाजपच्या गटाचे पूर्वीचे पत्र ग्राह्य धरून स्विकृत नगरसेवकांची घोषणा केली. त्यानुसार भाजप आघाडीला तीन तर शिवसेनेच्या आघाडीला दोन सदस्य नियुक्त करता आले. याविरूद्ध शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली.

हा विषय न्यायालयात गेला. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्णय देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ७ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच्या प्रकरणांचा दाखला देत ३० दिवसांच्या मुदतीत एका गटातून दुसऱ्या गटात जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवकांचा निर्णय वैध ठरवत शिवसेनेच्या गटाला मान्यता दिली. त्यामुळे आता शिवसेनेच्या ३२ नगरसेवकांचा गट नगर परिषदेत बहुमतात आला आहे. त्याचा फायदा विषय समित्यांच्या सभापती निवडीत शिवसेनेला होईल. आघाडीचा एक अधिकचा सदस्यही स्विकृत सदस्य होईल. तर नगर परिषदेचा कारभार हाकताना शिवसेना आघाडीचे वर्चस्व राहिल. त्यामुळे आता भाजप कोणत्या भूमिकेत राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबाबत भाजप आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुले यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

संघर्ष थांबणार का?

गेल्या पाच महिन्यात शिवसेनेने कोणत्या न कोणत्या कारणाने नगर परिषदेचे कामकाज रोखून भाजपला जेरीस आणले आहे. त्यामुळे या निकालानंतर आता भाजप शिवसेनेशी जुळवून घेत कारभार हाकेल की हा संघर्ष यापुढेही सुरूच राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेच्या गेल्या तीन सभा तहकूब झालेल्या आहेत.

पीठासीन अधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष आमच्या संख्याबळावर निवडला पण स्विकृत सदस्य त्यांच्या नसलेल्या संख्याबळावर ठरवले. हे अन्यायकारकच होते. सत्याचा विजय झाला आहे. – रविंद्र करंजुले, गटनेता, शिवसेना

आमच्या विजयाला चार महिने उशिर झाला. अंबरनाथकरांची ठप्प असलेली कामे आता सुरू होतील. विरोधकांनाही सोबत घेऊन काम करणार.- सदाशिव पाटील, उपनगराध्यक्ष, अंबरनाथ नगर परिषद.