अंबरनाथ: ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, अंबरनाथमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असलेल्या स्व. आनंद दिघे नाट्यमंदिराबाहेर बुधवारी दुपारी शस्त्रांसह एक संशयास्पद चारचाकी गाडी आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या वाहनातून एक छोटी तलवार आणि दांडके जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी गाडीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

बुधवारी दुपारी अंबरनाथ पालिकेच्या मागील बाजूस असलेल्या स्व. आनंद दिघे नाट्यमंदिरात नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. प्रशासकीय इमारतीमध्ये गळती लागल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या नाट्यगृहात पालिकेची सभा होत असते. बुधवारी ही सभा सुरू होती. याच वेळी नाट्यगृहाबाहेर नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद चारचाकी गाडी उभी होती. एका भाजप नगरसेवकाच्या भावाने या संशयास्पद गाडीबाबत माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनाची झडती घेतली. यावेळी गाडीत तरुण बसलेले होते, तर तपासणीत आतमध्ये तलवारीसारखे धारदार हत्यार आणि दांडके आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गाडी जप्त केली आणि दोघा आरोपींना ताब्यात घेतले.

धक्कादायक म्हणजे अंबरनाथ शहरातील नाट्यगृहापासून अवघ्या काही फूट अंतरावर अंबरनाथ पोलीस ठाणे आहे. नाट्यगृहाच्या आसपास पोलिसांची कायम वर्दळ असते आणि पोलिसांची अनेक वाहन ही उभी असतात. अशा स्थितीतही इत्यारांची चार चाकी तिथे उभी करण्याची आरोपींची हिंमत कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अंबरनाथ शहराला यापूर्वीही रक्तरंजित राजकारणाचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. या घटनेनंतर सर्वसाधारण सभा सुरू असलेल्या नाट्यगृह परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.