अंबरनाथः अंबरनाथच्या पालेगावातील एका तरूणीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशयातून २३ जून रोजी मारहाण करण्यात आलेल्या २१ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाच आरोपींनी अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्यूच्या बातमीनंतर संतप्त नातेवाईकांनी पाले गावातील एका भाजप नगरसेविकेच्या कार्यालयावर आरोपींनी मदत केल्याच्या आरोपातून दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी ठाण मांडले होते.
अंबरनाथ पूर्व भागात असलेल्या पालेगाव भागात एका तरूणाचे आपल्या पुतनीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय तरूणीच्या काकांना होता. त्यातून २३ जून रोजी ओम खोरे या तरूणाला पाच ते सात जणांनी अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर जखमी ओमला मुंबईच्या केईएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र बुधवारी उपचारादरम्यान ओमचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच तरूणाच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, रस्त्यात लागणाऱ्या एका भाजप नगरसेविकेच्या कार्यालयावर काही जणांनी दगडफेक केली. संबंधित नगरसेविकेने आरोपींना मदत केल्याचा आरोप नातेवाईकांचा होता. मात्र हे सर्व आरोप संबंधित नगरसेविकेने फेटाळले आहेत. तर कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही या नगरसेविकेने केली. संतप्त कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घातला. या प्रकरणातील सात आरोपींची नावे आम्ही पोलिसांना दिली होती. मात्र फक्त पाचच जणांवर कारवाई झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत ओमचा मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवू असा इशारा नातेवाईकांनी दिल्याने पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी संदिप गवळी, रवि परमार, नयन मडवी, सचिन पाटील, राज देसेकर या आरोपींना अटक केल्याची माहिती उपायुक्त गोरे यांनी दिली. तर आणखी संशयितांचा शोध सुरू असून त्यांनाही अटक केली जाईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
आरोपींना मदतीचा आरोप
या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सहकार्य केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत चौकशी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते दोन कर्मचारी कोण असे तर्कवितर्क लढवले जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
