ठाणे : सेवानिवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ साहाय्यक महेश गोसावी (वय ५३) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी हातोहात पकडले. याप्रकरणी गोसावी याच्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू होती.

तक्रारदार ५९ वर्षीय असून ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सेवानिवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी ते २७ ऑगस्ट या दिवशी अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेले होते. त्यावेळी कनिष्ठ साहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या महेश गोसावी याने निवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी चार ते पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची मंगळवारी पथकाने पडताळणी केली असता गोसावी याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचायत समिती कार्यालयाजवळ सापळा रचला. यावेळी गोसावी याला पाच हजार रुपयांची लाच घेताना हातोहात पकडण्यात आले. पथकाने गोसावी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (२०१८- संशोधन) मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.