अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेत सध्या शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी, गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील वाळेकर आणि करंजुले या दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षामुळे शहराच्या विकासकामांना मोठी खीळ बसली होती. विकासकामे रखडल्याने आणि दोन्ही कुटुंबांकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप वाढल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, आता सत्तेच्या समीकरणांसाठी आणि शहराच्या भल्यासाठी भाजप आमदारांच्या मध्यस्थीने वाळेकर आणि करंजुले कुटुंबांमध्ये अखेर दिलजमाई घडवून आणण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली चिखलफेक थांबण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि भाजपने युती न करता नगराध्यक्षपदासह सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. याच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून वाळेकर आणि करंजुले कुटुंबांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. या अटीतटीच्या निवडणुकीत वाळेकर यांना पराभवाचा धक्का बसला आणि तिथूनच या दोन राजकीय कुटुंबांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. निवडणुकीच्या चार महिन्यांनंतर राजकीय समीकरणे बदलली आणि नगरपालिकेत शिवसेना-भाजप युती सत्तेत आली. मात्र, सत्तेत एकत्र असूनही सभागृहात आणि विकासकामांच्या मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण सुरूच राहिले. गेल्या काही दिवसांत तर या संघर्षाने अत्यंत खालची पातळी गाठली होती. समाजमाध्यमांवरून एकमेकांच्या कुटुंबांविषयी वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.

या टोकाला गेलेल्या संघर्षामुळे शहरातील विकासकामे रखडत असल्याचे लक्षात घेऊन, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांतून शेजारच्याच शहरातील एका ज्येष्ठ भाजप आमदाराच्या निवासस्थानी वाळेकर आणि करंजुले कुटुंबांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, एकमेकांवरील वैयक्तिक आरोप आणि तक्रारी थांबवण्याबाबत त्यांच्यात समझोता घडवून आणण्यात आला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यापुढे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून केवळ शहर आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला आमदारांनी दोन्ही गटांना दिला आहे.

या बैठकीतील समझोत्यामुळे सध्यातरी अंबरनाथमधील राजकीय वातावरणातील तणाव निवळल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप आमदारांच्या मध्यस्थीने वाळेकर आणि करंजुले यांच्यातील ही टोकाला गेलेली राजकीय लढाई खरोखरच थांबणार, की भविष्यात या राजकीय कुरघोड्यांचा पुढील अंक लवकरच अंबरनाथकरांना पाहायला मिळणार, याकडे आता संपूर्ण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.