अंबरनाथः अनेक दिवस लांबलेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून अंबरनाथ शहरात रिमझीम स्वरूपात सुरू आहे. मात्र या रिमझीम पावसातही अनेक रस्त्यांवर, उड्डाणपुलावर पाणी साचत असल्याची बाब समोर आली आहे. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका आणि टी जंक्शन चौकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर कामगारांना पाणी काढण्याची वेळ आली आहे. तर फॉरेस्ट नाका ते बदलापूर रस्ता, अंबरनाथचा बाह्यवळण रस्ता याठिकाणीही पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची कसरत होते आहे.

गेल्या वर्षात पाऊस लवकर आल्याने यंत्रणांना नालेसफाईसह रस्त्याच्या शेजारी पाण्याची निचरा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता, अशी सबब सांगितली जात होती. मात्र यंदा पाऊस उशिरा येऊनही यंत्रणांकडून रस्त्यावरील, उड्डाणपुलावरील पाणी निचरा यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नसल्याचे पहिल्याच पावसात समोर आले.

अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका ते बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या भागात रस्त्याच्या किनारी पाणी निचरा होण्याची व्यवस्थाच नाही. त्यामुळे पाऊस झाल्यास गणपत धाबा, पुढे एस थ्री पार्क हॉटेल, त्यापुढील रहिवासी संकुल, यशवंत धाबा या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर अंबरनाथ नगर परिषद हद्दीत सांडपाण्याच्या वाहिन्यांचे पाणी थेट रस्त्यावर कारंजा उडाव्या तसे उडते. त्याचा पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या जैसे थी आहे.

यंदाच्या पहिल्याच पावसात पुन्हा या भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चालताना त्रास होत होता. फॉरेस्ट नाका ते टी जंक्शन या रस्त्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही तोंडांना पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनचालकांना त्यातूनच मार्ग काढावा लागत होता. अनेकदा टी जंक्शनकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून जाणाऱ्या वाहनामुळे उडणारे पाणी शेजारच्या मार्गिकेवली वाहनचालकावर उडत असल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक संताप व्यक्त करत होते. येथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बादलीने पाणी उपसून दुसऱ्या मार्गिकेत टाकले जात होते. त्यामुळे मार्गिकेचा काही भाग बंद करून ठेवण्यात आला होता. तर बाह्यवळण रस्त्यावरही स्मशानभूमीच्या समोर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागल होता.

अवघ्या काही तासांच्या रिमझीम पावसाने ही अवस्था असेल तर पुढील संपूर्ण पावसाळ्यात काय होणार, असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. नव्या कोऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरही पाणी साचत असल्याने या कामाची दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.