अंबरनाथः एकीकडे प्रदुषणामुळे वालधुनीसारख्या नदीची गटारगंगा झाली असताना राज्य सरकार नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी मोठा कार्यक्रम आखत आहे. मात्र स्थानिक पातळीवर कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक सांडपाणी प्रक्रिया केंद्रच कार्यान्वित नसल्याची बाब अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी उजेडात आणली आहे. या प्रकारानंतर कंत्राटदाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नगराध्यक्षांनी आता कंत्राटदाराचे बील थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
नागरी सांडपाणी थेट नदी, नाल्यांमध्ये सोडल्याने जलप्रवाह दूषीत होत असल्याने या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनीे भेट देत पाहणी केली होती. तर शेजारच्या अंबरनाथ शहरात नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट जीन्स धुलाई कारखान्यांचे पाणी सोडले जात असल्याचे तहसिलदारांच्या कारवाईत उघड झाले होते. अंबरनाथ शहरातून वाहणारी वालधुनी नदी यापूर्वीच प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. त्यामुळे या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मात्र दुसरीकडे अंबरनाथ नगर परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे. नुकतेच नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी वडोल येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला अचानक भेट दिली. हे प्रक्रिया केंद्र ४५ दशलक्ष लीटर क्षमतेचे आहे. मात्र या केंद्रात अवघ्या २२ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यात गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पात प्रक्रियाच केली नसल्याची बाब समोर आली आहे. नगराध्यक्षांच्या भेटीची चाहूल लागताच येथील कंत्राटदाराने मुख्य केंद्रातील मोटारी सुरू केल्या. मात्र तरीही अनेक दिवसांपासून प्रकल्प बंद असल्याने त्यावर शेवाळ साचल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचे यापूर्वीही समोर आले होते. मात्र त्यानंतरही याच कंत्राटदाराला या प्रकल्पाचे काम देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेतील कोणते अधिकारी या कंत्राटदारावर मेहेरबान आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
नगराध्यक्षांच्या पाहणी येथे दुरावस्था झाली असून प्रकल्प सुरू नसल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना नगराध्यक्षा करंजुले यांनी धारेवर धरले. तसेच संबंधिक कंत्राटदाराला तात्काळ काम थांबवत त्यांचे बिलही थांबवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले आहेत.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
एकीकडे शेजारच्या बदलापूर नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रियेचा प्रश्न न्यायालयात आहे. दुसरीकडे अंबरनाथ शहरातील प्रदुषणाचा मुद्दाही अनेकचा चर्चेत असतो. अशा स्थितीतही या सांडपाणी प्रकल्पाला भेट देण्याची गरजही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना वाटली नाही का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कोणत्याही पाहणी शिवाय कंत्राटदाराला नियमीत बिले दिली जात असल्याने यात अधिकाऱ्यांचे डोळेझाक करणे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
