अंबरनाथः शासनाने दिलेल्या जागेचा नियमबाह्य पद्धतीने वापर केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने अंबरनाथच्या शेतकी सोसायटीची जागा शासनजमा करण्याचे आदेश दिले होते. ज्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही जागा आवश्यक होती त्या ८ हेक्टर जागेवरील बांधकामे हटवण्सास बुधवारी प्रशासनाने सुरूवात केली.
अंबरनाथ नगर परिषद आणि तहसिलदार यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ६ बांधकामे, एक सुरक्षा भिंत आणि एक बेकायदेशीर जीन्स धुलाई कारखाना कारवाईत उध्वस्त करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या जागेवर जीन्स धुलाई कारखाना बिनदिक्कतपणे सुरू होता. त्याचे सांडपाणी थेट वालधुनी नदीच्या उपनदीत सोडले जात असल्याचेही समोर आले.
अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी संस्थेला सन १९६३ मध्ये शेतीसाठी विनामूल्य दिलेली तब्बल २१० एकर सरकारी जमीन शासनजमा करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने येथील शेतकी सोसायटीचे अपील फेटाळून लावत राज्य सरकारचा जमीन पुनर्ग्रहणाचा निर्णय पूर्णतः योग्य ठरवला होता. याच जमिनीचा बहुतांश भाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यासाठी वापरली जाणार आहे.शेतीसाठी दिलेल्या सरकारी जमिनीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे यावेळी दिसून आले. फक्त ७.६८ हेक्टर (सुमारे १९ एकर) भागात काही झाडांची लागवड होती. उर्वरित जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर घरे व चाळी, दुकाने व शेड, फार्महाऊस, सुमारे ४०० ते ५०० अतिक्रमणे होती. तसेच शेती जवळजवळ पूर्णतः बंद होती.
ही जागा तीन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक तहसिलदारांना न्यायालयाने दिले होते. आदेशानंतर काही दिवसातच ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी येथील शेतकी सोसायटीच्या जागेवरील सर्व्हे क्रमांक ११६/५ वरील बांधकामे पाडण्यात आली. या ८ हेक्टर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय उभारण्याचे प्रस्तावीत आहे. या कारवाईत ६ बांधकामे, एका जागेवरील सुरक्षा भिंत तर एक जीन्स कारखाना जमीनदोस्त करण्यात आला आहे. अंबरनाथचे तहसिलदार अमित पुरी, अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारवाई करण्यात आली.
जीन्स धुलाई कारखाना उघड
दरम्यान या कारवाईत वालधुनी नदीचा उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैसर्गिक प्रवाहाशेजारीच सुरू असलेला जीन्स धुलाई कारखाना उघडकीस आला आहे. या कारखान्यातून थेट प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट वालधुनीला जाऊन मिळणाऱ्या प्रवाहात सोडले जात होते. तर आसपासच्या परिसरातही हे निळेशार पाणी साचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात हा कारखाना सुरू होता. मात्र कोणत्याही प्रशासनाला दिसला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

