अंबरनाथ: अंबरनाथ शहरात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्वतःच्याच पक्षाचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यातील त्यांच्या भाषणाचा काही भाग समाज माध्यमांवर प्रसारीत झाला असून त्यात वाळेकरांनी आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. सोबतच त्यांनी परिषदेतील बेजबाबदार कारभार, अनधिकृत होर्डिंग्ज आणि हाऊसिंग बोर्डाच्या रखडलेल्या प्रकल्पावरून आमदारांसह पक्षाच्या गटनेत्यांना आणि नगरसेवकांनाही खडेबोल सुनावले आहेत.
अंबरनाथ नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष असून शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपनगराध्यक्ष आहे. सध्या शहरात सर्व निवडून आलेले नगरसेवक सत्ताधारी झाले आहेत. विरोधी पक्ष नसलेल्या या नगर परिषदेत आता सत्ताधारी पक्षातील आणि विशेषतः शिवसेनेतील एक गट विरोधकाच्या भूमिकेत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या भाषणामुळे पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या मेळाव्यात बोलताना वाळेकरांनी, आपण नगरपालिकेच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवले पाहिजे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर राजू वाळेकर यांनी उघडपणे भूमिका मांडली, मात्र आपले शिवसेनेचे गटनेते आणि इतर नगरसेवक यावर काहीच बोलत नाहीत, याबद्दल त्यांनी भाषणातून तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर थेट निशाणा साधताना वाळेकर म्हणाले की,
“आमदार साहेबांबद्दल मला जाहीरपणे काहीच बोलायचे नाही, मी एकट्यात भेटून गोपाळ लांडगे साहेबांना ते सांगेन. ” मात्र, असे म्हणत असतानाच त्यांनी आमदारांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.
“काहीही करायचे नाही आणि संध्याकाळी फक्त स्वतःच्या फार्म हाऊसवर जाऊन बसायचं, असे आता चालणार नाही, ” अशा बोचऱ्या शब्दांत वाळेकरांनी आमदारांना लक्ष्य केले. तसेच, आमदार बालाजी किणीकर हे २०११ सालचा शासनादेश आता दाखवून झोपडपट्टीवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
हाऊसिंग बोर्डाच्या रखडलेल्या प्रकल्पावरूनही वाळेकरांनी आमदारांवर जोरदार प्रहार केला. हाऊसिंग बोर्डाचे १९२ लोक आजही बेघर आहेत, त्यातील २० जणांचा मृत्यू झाला असून त्यांना साधे भाडेही मिळत नाही. तब्बल १५ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या आमदारांनी यावर आवाज उठवला, त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली पाहिजे, असा उपरोधिक टोला वाळेकरांनी लगावला. किमान त्यांनी पुढच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत या १९२ कुटुंबांना घरे मिळवून द्यावीत, मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन, असे खुले आव्हानच वाळेकर यांनी दिले. अंबरनाथमधील काही शिवसैनिकही सांगतात की त्यांची घरे या प्रकल्पात अडकली आहेत, मग आमदार नक्की करत तरी काय आहेत, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसैनिकांना आक्रमकतेचा मंत्र देताना वाळेकर पुढे म्हणाले की, वरिष्ठांनी दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. सर्व कार्यक्रम आपण लावले पाहिजेत. आपण सर्वांनी शहर शाखेत आले पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामे करवून घ्यायची आहेत, त्यासाठी वेळ पडल्यास पालिकेवर मोर्चा काढण्याचीही आपली तयारी हवी, असेही वाळेकर यावेळी बोलताना म्हणाले. अनधिकृत होर्डिंग्जच्या विरोधात आपण मोहिम घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अंबरनाथ नगरपालिकेने कारवाईला कशी सुरुवात केली, याचा दाखला त्यांनी यावेळी दिला.
अंबरनाथ शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे या भाषणावरून स्पष्ट होते आहे. पुन्हा एकदा शहरप्रमुख विरुद्ध आमदार असा थेट संघर्ष उभा राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या थेट आव्हानावर आमदार बालाजी किणीकर काय प्रतिक्रिया देतात आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या वादावर कसा तोडगा काढतात, याकडे संपूर्ण अंबरनाथ शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
