अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात उघडलेली मोहीम अवघ्या आठ दिवसांतच अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. प्रशासनाचा कोणताही धाक न बाळगता सोमवारचा पारंपरिक आठवडी बाजार पुन्हा एकदा त्याच जोमाने सुरू झाल्याने पालिकेच्या कारवाईवर अंबरनाथकरांमधून सडकून टीका होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या आठवड्यात ज्या बाजारकऱ्यांना हुसकावून लावले होते, त्यांनी पुन्हा रस्त्यावर ठाण मांडल्याने यामागे नेमका कोणाचा ”वरदहस्त” आहे, अशी चर्चा आता शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गेल्या आठवड्यात मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी शहराला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण विभाग आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांना रस्त्यावर उतरवले होते. रेल्वे स्थानक परिसरातील वर्षानुवर्षे भरणारा सोमवारचा बाजार पालिकेच्या पथकाने कडक बंदोबस्तात रोखून धरला होता. अनेक वर्षांनंतर स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, प्रशासनाची ही कारवाई केवळ एका आठवड्यापुरताच मर्यादित राहिल्याचे काल सोमवारी स्पष्ट झाले. पालिकेच्या कारवाईला हरताळ फासत शेकडो विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली.

पादचारी आणि वाहनचालक वेठीस

या आठवडी बाजारामुळे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या स्थानक पादचारी पूल परिसरात सोमवारी पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर भाजी आणि कपडे विक्रेत्यांनी ताबा मिळवल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. त्यात भर म्हणून अनधिकृत रिक्षाचालकांनीही मधोमध रिक्षा उभ्या केल्याने स्टेशन परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. दिवसभर चालणाऱ्या या गोंधळामुळे अंबरनाथकर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

कारवाई की केवळ फार्स ?

पालिका प्रशासन नेहमीच कोट्यवधी रुपये खर्च करून अतिक्रमण हटाव मोहीम राबवते, मात्र त्याचे परिणाम २४ तास देखील टिकत नाहीत. एका बाजूला शहर फेरीवालामुक्त करण्याचे दावे केले जात असताना, मुख्य स्थानकाच्या चौकातच पालिकेच्या नाकावर टिचून बेकायदा बाजार भरतोच कसा, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकारामुळे पालिकेच्या कारवाईची विश्वासार्हता संपली असून, आता मुख्याधिकारी यावर काय ठोस पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.