अंबरनाथः प्रशासकीय अधिकारी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती रुबाबदार खुर्ची, एसी केबिन आणि फाईल्सचा ढीग. मात्र, अंबरनाथमध्ये प्रशासनाचा एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद चेहरा पाहायला मिळाला. आदिवासी बांधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी चक्क आपली शासकीय खुर्ची सोडली आणि ते थेट जमिनीवर आदिवासी बांधवांसोबत खाली बसले. अत्यंत आपुलकीने आणि संवेदनशीलतेने त्यांनी तब्बल तीन तास आदिवासी बांधवांच्या समस्या समजून घेतल्या. प्रशासनाच्या या अनोख्या पुढाकारामुळे शासकीय भिंतींमधील अंतर गळून पडले आणि एका सकारात्मक संवादाला सुरुवात झाली.
अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषदेचे अधिकारी, गटविकास अधिकारी, मुंबई शिधावाटप कार्यालय, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आदिवासी पाड्यांवरील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न मुख्यत्वे समोर आला. यावर तहसीलदार अमित पुरी यांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना येत्या ७ दिवसांत प्रत्येक आदिवासी पाड्यावर स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवून पाणी साठवणुकीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. कातकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ नयेत, म्हणून त्यांना तात्काळ जातीचे दाखले आणि जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तहसीलदारांमार्फत १ हजार अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आधार कार्डपासून वंचित असलेल्या आदिवासी कुटुंबांसाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासन आणि श्रमजीवी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या विशेष शिबिरांचे नियोजन करून त्याचा कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार “आदर्श अभ्यासिका “
आदिवासी भागातील मुला-मुलींना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात यासाठी तालुक्यातील सर्व आदिवासी बहुल गावांमधील शाळांमध्ये “आदर्श अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रे ” उभारण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदवीधर तरुण-तरुणींपर्यंत सर्वांना याचा मोठा फायदा होणार असून, या केंद्रांचे संनियंत्रण स्वतः तहसीलदार अमित पुरी करणार आहेत.
आता दरमहा होणार संयुक्त आढावा बैठक
प्रश्नांवर केवळ चर्चा न थांबवता त्यांचा नियमित पाठपुरावा व्हावा, यासाठी आता दर महिन्याला सर्व प्रशासकीय अधिकारी आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीला श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
