अंबरनाथ: अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या शहाड आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणी पुरवठा गुरुवार, ४ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून ते शुक्रवार ५ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षात मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यापासून सुरुवातीला अवकाळी तर नंतर मोसमी पावसाने हजेरी लावली होती. परिणामी बाष्पीभवन थांबून जलस्त्रोतांमध्ये पाणी साठा वाढू लागला होता. यंदाच्या वर्षात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तापमानाने नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यात यंदा मोसमी पाऊस उशिराने आणि कमी क्षमतेने कोसळण्याचा अंदाज आहे. जून महिना कोरडा जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी साठी ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरवण्याचे आव्हान पाणी व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांपुढे आहे. त्यामुळे त्यांनी आताच पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तर आंध्रा धरणात सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून उल्हास नदी बारमाही प्रवाही राहून अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटवते. आंध्रा व बारवी धरणातील पाण्याची सद्यस्थितीतील टंचाई लक्षात घेऊन ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याची सुरुवात जून महिन्यापासून केली जाणार असून येत्या गुरुवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे. या मोठ्या पाणी कपातीचा थेट फटका कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र यांसह परिसरातील इतर सर्व ग्रामपंचायती, नागरी वस्त्या, गृहसंकुले आणि स्थानिक उद्योगांना बसणार आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक ५ जून रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर मुख्य पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल, मात्र त्यानंतरही पुढील काही काळ संबंधित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाण्याचा हा २४ तासांचा बंद आणि त्यानंतरचा कमी दाबाचा पुरवठा लक्षात घेता, संबंधित सर्व औद्योगिक व घरगुती ग्राहकांनी पाणी कपातीपूर्वीच आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठा करून ठेवावा, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आवाहन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता डोंबिवली विभाग आणि उप अभियंता शहाड उपविभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या टंचाईच्या काळात सर्व नागरिक, स्थानिक संस्था आणि उद्योजकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करत महामंडळाला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. त्यामुळे ऐन जून महिन्यात पाणी व्यवस्थापनाची आणि काटकसरीने पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.