उल्हासनगर : अंबरनाथ येथील प्रकाश नगर परिसरात घरात खेळत असलेल्या एका ३ वर्षांच्या बालकाला विषारी सापाने चावल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर आधी चावलेल्या सापाचा फोटो दाखवा, मगच उपचार करू अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आणि उपचारास दिरंगाई केल्यामुळेच बालकाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप मृत बालकाच्या संतप्त कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारानंतर रुग्णालयात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला होता. रूग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत.

अंबरनाथच्या पूर्व भागात शिलाहारकालीन शिवमंदिर जवळील प्रकाश नगर भागात सुलतान शेख हा ३ वर्षांचा चिमुरडा आपल्या घरात खेळत होता. खेळत असतानाच अचानक एका विषारी सापाने त्याच्या कमरेला दंश केला. सुलतानला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत त्याला तात्काळ उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी मुलावर तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी, कोणता साप चावला आहे ते समजण्यासाठी आधी त्या सापाचा फोटो दाखवा, मगच उपचार करू असा अजब अट्टाहास धरल्याचा आरोप शेख कुटुंबीयांनी केला आहे.

सापाचा फोटो शोधण्यात आणि डॉक्टरांशी वाद घालण्यात मौल्यवान वेळ वाया गेला आणि याच दिरंगाईमुळे उपचाराला उशीर होऊन सुलतानचा मृत्यू झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. हसत्याखेळत्या मुलाचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने संतप्त आणि दुःखी झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त करत गोंधळ घातला.

दरम्यान, मध्यवर्ती रुग्णालयातील प्रशासनाने आणि संबंधित डॉक्टरांनी शेख कुटुंबीयांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. बालकाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची प्रकृती आधीच कमालीची खालावली होती. डॉक्टरांनी कोणतीही दिरंगाई न करता उपलब्ध वैद्यकीय उपचार पद्धतीनुसार तात्काळ उपचार सुरू केले होते, असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे. बालकाला रुग्णालयात आणण्यास कुटुंबीयांकडूनच उशीर झाला असावा आणि त्याच कारणाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे. या घटनेमुळे अंबरनाथच्या प्रकाशनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करताना पाळल्या जाणाऱ्या नियमांवरून आता पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.