अंबरनाथ: राज्यासह अंबरनाथ शहरातही सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने शहरातील सिग्नल यंत्रणा दुपारी काही काळासाठी बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवार ८ मे २०२६ पासून पावसाळा सुरू होईपर्यंत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत शहरातील सर्व सिग्नल तात्पुरते बंद राहतील.
शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध राहावी यासाठी नगरपरिषदेने ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, दुपारच्या वेळी सिग्नलवर लागणाऱ्या दीर्घ प्रतीक्षा कालावधीमुळे वाहनचालकांना रणरणत्या उन्हात उभे राहावे लागत होते. या प्रखर उष्णतेमुळे अनेक वाहनधारकांना चक्कर येणे, उष्माघाताचा त्रास होणे किंवा तब्येत बिघडण्याच्या घटना समोर येत होत्या. काही ठिकाणी तर उन्हापासून वाचण्यासाठी सिग्नल तोडण्याच्या घाईमुळे अपघातसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडे अशाच प्रकारे दुपारच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद ठेवावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर बदलापूर शहरात दुपारच्या वेळी सिग्नल यंत्रण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचनुसार अंबरनाथमध्येही ही व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांचे आरोग्य आणि रस्ते सुरक्षितता या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने हे पाऊल उचलले आहे.
हा निर्णय अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. त्यानुसार दुपारी ४ वाजेनंतर जेव्हा उन्हाची तीव्रता काहीशी कमी होईल, तेव्हा ही सिग्नल यंत्रणा पुन्हा पूर्ववत सुरू केली जाणार आहे. या निर्णयामुळे अंबरनाथकरांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी सिग्नल बंद असलेल्या कालावधीत वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगावी आणि वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
