अंबरनाथ : अंबरनाथ व उल्हासनगर या दोन्ही शहरांचा गाडा हाकणाऱ्या पालिका प्रशासनांचा कारभार सध्या गळक्या व धोकादायक इमारतींतून सुरू असल्याचे विदारक चित्र उजेडात आले आहे. एका बाजूला अंबरनाथ पालिकेच्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मुख्यालयाला अवघ्या दोन वर्षांतच गळती लागली आहे, तर उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे.
नव्या इमारतीसाठी अद्याप जागाच मिळत नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. दोन्ही शहरांमधील या स्थितीमुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ नगर परिषदेने ३५ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून नवीन प्रशासकीय इमारत उभारली. मात्र, दोनच वर्षांत इमारतीच्या छतातून ठिकठिकाणी पाणी गळत आहे. गळतीमुळे इमारतीच्या आतील सजावट खराब झाली आहे. अनेक भागातील मुलामा निखळून पडला आहे.
भिंतींना मोठ्या प्रमाणावर ओल आली आहे. छताचा एखादा भाग अंगावर पडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एका ठिकाणचे प्रवेशद्वार नागरिकांसाठी बंद केले आहे. करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी होत असल्याने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
उल्हासनगर महापालिकेची अवस्था याहूनही गंभीर आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील २८३ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करत नागरिकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावणाऱ्या पालिकेचे स्वतःचे मुख्यालयच धोक्याच्या सावटाखाली आहे. हे मुख्यालय संरचनात्मक लेखापरिक्षणात धोकादायक ठरले आहे. इमारतीला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. असे असतानाही याच इमारतीतून दररोज महत्त्वाचे प्रशासकीय कामकाज सुरू असून शेकडो अधिकारी, कर्मचारी व विविध कामांसाठी येणारे नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत.
नव्या प्रशासकीय मुख्यालय उभारण्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून राज्य सरकारकडून ५० कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र, गेली दोन वर्षे मुख्यालयाचा कारभार हलवण्यासाठी पर्यायी जागाच निश्चित न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ कागदावरच रखडला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.
शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या उल्हासनगर महापालिकेने स्वतःच्या मुख्यालयाच्या सुरक्षिततेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, तर अंबरनाथमध्ये नव्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील पालिका प्रशासनांनी स्वतःच्या घराची दुरवस्था तातडीने दूर करावी व एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.
