बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या वांगणी येथील ग्रामीण रूग्णालयात डिसेंबर महिन्यात काही औषधे बुरशीसदृश्य असल्याची तक्रार एका महिला रूग्णाने केली होती. त्यानंतर या औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांमध्ये बुरशीजन्य संक्रमणाची वाढ झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र ही औषधे विरघळण्याच्या (डिसॉल्व्हिंग) पातळीवर अप्रमाणित असल्याचे समोर आले आहे. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी याबाबतची माहिती राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी दिली. याप्रकरणी आता संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकून ही विकत घेणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
शासकीय रूग्णालयातील औषधांबाबत रूग्णांच्या अनेक तक्रारी असतात. डिसेंबर महिन्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात वांगणी गावात असलेल्या ग्रामीण रूग्णालयात अशाच प्रकारची एक तक्रार समोर आली होती. येथील एक गरोदर महिला तपासणीसाठी रूग्णालयात गेली होती. त्यावेळी त्या महिलेला देण्यात आलेल्या औषधांमध्ये काही औषधे काळी झाल्याची दिसून आली. त्यामुळे ही औषधे बुरशी लागलेली तर नाही ना, असा संशय आल्याने त्या महिलेने रूग्णालय प्रशासनाला तक्रार दिली. याची माहिती मिळताच स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रूग्णालयात या औषधांची तपासणीची मागणी केली होती. त्यानंतर या औषधांची चौकशी करण्यात आली.
या बाबतचा प्रश्न दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. त्यावर माहिती देताना राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तक्रार असलेली औषधे ही जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली होती, अशी माहिती आबिटकर यांनी दिली. या औषधांमध्ये कोणत्याही बुरशीजन्य संक्रमणाची वाढ झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी या औषधांमध्ये असलेल्या घटांवरून ही औषधे अप्रमाणीत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
प्रत्येक औषधांमध्ये विरघळण्याच्या प्रमाणाची (डिसॉल्व्हिंग ) टक्केवारी असते. ती टक्केवारी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असावी असे अभिप्रेत आहेत. मात्र वांगणीच्या रूग्णालयात देण्यात आलेल्या त्या औषधांमध्ये ही टक्केवारी ५९.१६ इतकी असल्याचे समोर आले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे औषधे ठराविक वेळेत विरघळत नाही. परिणामी त्याचा रूग्णांच्या आरोग्याला तितकासा उपयोग होत नाही. त्यामुळे ही औषधे अप्रमाणित असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.
या औषधांना ज्या प्रयोगशाळांनी मान्यता दिली त्या प्रयोगशाळांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा यावेळी आबिटकर यांनी केली. तसेच त्यांचे मान्यता प्रमाणपत्रही रद्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयोगशाळांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या औषधांची खरेदी करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी केली जाईल, असेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करा
दरम्यान, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या औषधांच्या बाबतीत दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून पालकमंत्र्यांनीही याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील राहण्याच्याही सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केल्या.
