अंबरनाथ : काही महिन्यांपासून अंबरनाथ शहरातील पाणी वितरण व्यवस्था कोलमडली असून, धरणे भरलेली असतानाही नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहरात अनेक भागांत तब्बल तीन ते चार दिवसांनी आणि तेही अत्यंत कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप खदखदत आहे.

शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर थेट नगराध्यक्षांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली होती. या वाढत्या जनक्षोभाची व पाणी समस्येची दखल घेत अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे धाव घेतली. आमदारांच्या विनंतीनुसार मंत्र्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अंबरनाथच्या पाणी समस्यांबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. येत्या १५ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिली आहेत.

अंबरनाथ शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. पूर्वेतील अनेक भागात कपात सदृश्य पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर पश्चिमेत तीन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने स्थानिक नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आंदोलन केले होते. या आंदोलनात अंबरनाथच्या नगराध्यक्षांनाही सहभागी व्हावे लागले होते. त्यानंतर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती.

या बैठकीत अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. किणीकर यांनी शहरातील विस्कळीत पाणी वितरणाचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. यावेळी प्रामुख्याने केंद्र शासनाच्या अमृत टप्पा-२ योजनेतील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शहरात पाण्याचे समान वितरण व्हावे यासाठी आवश्यक त्या ठिकाणी फ्लो मीटर बसविणे आणि जलकुंभांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली. तसेच, अंबरनाथमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे पाणी उपसा थांबतो आणि पाणीपुरवठ्यात मोठी अडचण निर्माण होते, यावर तोडगा म्हणून तातडीने जनरेटरची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले.

याशिवाय शहराच्या विस्तारित व उंच भागातील जावसई, फुले नगर व नारायण नगर परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यावरही सकारात्मक चर्चा झाली. शहरात होणारी पाण्याची गळती व पाणी चोरी रोखण्यासाठी एका विशेष भरारी पथकाची नियुक्ती करणे, तसेच पाणी वितरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या ‘व्हॉल्व्हमन’ (जलवाहिन्यांच्या झडपा बंद वा चालू करणारी यंत्रणा) व्यवस्थेला अधिक सक्षम करून नियोजनबद्ध पाणी सोडण्याची व्यवस्था करणे, यावरही या बैठकीत विचारमंथन झाले.

अंबरनाथकरांना भेडसावणाऱ्या या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच, या सर्व उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करून येत्या १५ दिवसांत शहरातील पाणीपुरवठ्यात निश्चितच सकारात्मक बदल जाणवतील, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी यावेळी दिले. मंत्र्यांनी दिलेले निर्देश व १५ दिवसांत सुधारणा करण्याचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरते का, की केवळ आश्वासनांची खैरात ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.