कल्याण – आपल्या मुलाच्या दोन वर्षापूर्वी रेल्वे मार्गातील आत्महत्येला मुलाची प्रेमिका जबाबदार आहे. या प्रेमिकेने आपल्या मुला बरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच बरोबर या तरूणीने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ही तरूणी आपल्या मुलाला लैंगिक अडचणीची कारणे देऊन टाळू लागली. या सर्व तणावातून आपल्या २७ वर्षाच्या मुलाने अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे मार्गात आत्महत्या केली, असा संशय घेत मृत तरूणाच्या कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रेमिके विरूध्द शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे.
अनिल सूर्यवंशी यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मुलाच्या प्रेमिकेवर संशय घेत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे. प्रशांत अनिल सूर्यवंशी (२७) असे रेल्वे मार्गात आत्महत्या करून मरण पावलेल्या तरूणाचे नाव आहे. अनिल सूर्यवंशी आपल्या कुटुंबीयांसह अंबरनाथ येथे राहतात. ते उल्हासनगर येथे इलेक्ट्रिक वस्तू विकण्याचे काम करतात. डिसेंबर २०२४ मध्ये प्रशांतने रेल्वे मार्गात आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्युविषयी संशय असल्याने वडिलांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशीची मागणी केली होती.
मृत्युच्या दिवशी प्रशांत सकाळी कामावर जातो सांगून निघून गेला होता. घरी परतल्यावर आम्ही शिवमंदिरात अन्नदान कार्यक्रमासाठी गेलो होतो. रात्री साडे नऊ वाजता प्रशांत घरातील दुचाकी काढून आपण मित्राच्या हळदी कार्यक्रमाला जात आहे असे आईला सांगितले होते. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान प्रशांतच्या कुटुंबीयांशी संबंधित एका रहिवाशाला प्रशांतने संपर्क करून आपण आता रेल्वे मार्गात आत्महत्या करत आहोत असे मोबाईलवरून सूचित केले. बोलत असतानाच प्रशांतचा फोन कट झाला होता. ही माहिती रहिवाशाने तातडीने प्रशांतच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी रात्रभर अंबरनाथ, बदलापूर रेल्वे मार्गा दरम्यान प्रशांतचा शोध घेतला तो आढळून आला नाही. त्याची दुचाकी मात्र रेल्वे मार्गाजवळ उभी करून ठेवल्याचे दिसत होते.
दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी प्रशांतचा रेल्वे मार्गात शोध घेतला. तेव्हा रेल्वेच्या कामगारांनी बदलापूर अंबरनाथ रेल्वे मार्गात एक मृतदेह पडला असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. प्रशांतचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकरणाला वळण
मृत तरूणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेली माहिती, अशी की प्रशांतचे बदलापूरच्या एका तरूणी बरोबर प्रेम होते. ही तरूणी अंबरनाथ पूर्व येथे एका हबमध्ये काम करत होती.
ही तरूणी नियमित प्रशांतशी मोबाईलवर बोलत असायची. त्यांचा संवाद नियमित रात्रीअपरात्री होत होता. हे कुटुंबियांना माहिती होते. प्रशांत तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. दरम्यान त्या तरूणीने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरा बरोबर पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. हे कळल्यापासून प्रशांत आणि त्या तरूणीमध्ये वाद सुरू झाले होते. आपण प्रेम करत असताना दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम आणि लैंगिक संबंधातून प्रशांत आणि तरूणी यांच्यात वाद सुरू होते. या सर्व कारणातून संबंधित प्रेमिकेने आपल्या मुलास आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा संशय घेत तशी तक्रार मृत प्रशांतच्या वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली आहे.
