ठाणे : ज्या वयात मुले गोष्टींच्या पुस्तकात चंद्र-चांदण्या शोधतात, त्याच वयात विद्यार्थ्यांना थेट चंद्रावर आपले नावं पोहोचविण्याची संधी मिळणं ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक आहे ना?… पण, हो ही गोष्ट खरी आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयात विज्ञानाचा दृष्टिकोन निर्मण व्हावा, केवळ खगोलशास्त्राचे पुस्तकी ज्ञान न मिळता त्यांच्यामध्ये खागोलशास्त्र या विषयी प्रत्यक्ष ओढ निर्माण व्हावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील इंदगाव जिल्हा परिषद शाळेने एक अनोखा उपक्रम राबवित थेट ‘चंद्रभरारी’ घेतली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळा इंदगाव आता ग्लोबल नाही, तर चक्क ‘युनिव्हर्सल’ झाली आहे. अशीच चर्चा रंगू लागली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीही आता थेट अंतराळात झेप घेतली आहे. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदगाव येथील विद्यार्थ्यांची नावे NASA च्या Artemis-II अंतराळ मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत पाठवली जाणार आहेत. हा अनोखा उपक्रम शाळेतील मुख्याध्यापक अमोल राजेंद्र पेन्सलवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी प्रेरणा मिळाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही जागतिक स्तरावरील वैज्ञानिक उपक्रमात सहभागी होऊ शकतात, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

विद्यार्थ्यांनी कशी घेतली चंद्रभरारी…

NASA च्या “Send Your Name to the Moon” या आंतरराष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक अमोल राजेंद्र पेन्सलवार यांनी इयत्ता चौथी आणि पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन नोंदवली. त्यानंतर प्रत्येकाला NASA कडून डिजिटल बोर्डिंग पास प्राप्त झाला आहे. हे नाव विशेष SD कार्डमध्ये संग्रहित करून Artemis-II मोहिमेद्वारे चंद्राभोवती फिरवले जाणार आहे.

NASA ची Artemis-II अंतराळ मोहीम नक्की काय?

नासा आपल्या आगामी Artemis-II (आर्टेमिस-२) या ऐतिहासिक चांद्र मोहिमेसाठी लोकांची नावे गोळा करत आहे. हे मिशन २०२६ मध्ये प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच चार अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतणार आहेत. त्यासाठी आपले नाव चंद्रावर पाठवण्यासाठी त्या व्यक्तीला नासाच्या अधिकृत वेबसाईटवर आपले नाव नोंदवावे लागणार आहे. सर्व जमा झालेली नावे एका सूक्ष्म SD कार्ड मध्ये डिजिटल स्वरूपात साठवली जातात. त्यानंतर हे कार्ड ओरियन (Orion) अंतराळयानात ठेवले जाते. जेव्हा हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करते, तेव्हा तांत्रिकदृष्ट्या तुमचे नावही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असते.

ग्रामीण भागातील शाळेचे नाव थेट नासा संस्थेशी आणि चंद्राशी जोडले जाणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक वाटचालीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे. – अमोल पेन्सलवार, मुख्याध्यापक इंदगाव अंबरनाथ जिल्हा परिषद शाळा.