कल्याण – नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसच्या दारात उभा असताना एका तरूणाच्या हातामधील मोबाईल आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फटका टोळीच्या तीन गुंडांनी काठीचा फटका मारून रेल्वे मार्गात पाडला. तो मोबाईल घेऊन फटका टोळीचे सदस्य पळत असताना, तरूणाने एक्सप्रेसचा वेग कमी होताच, एक्सप्रेसमधून रेल्वे मार्गाच्या बाजुला उडी मारून त्या टोळीचा मोबाईल परत मिळविण्यासाठी पाठलाग केला. ते तिन्ही चोरटे मोबाईल घेऊन दुचाकीवरून पसार झाले.
या प्रवासी तरूणाच्या धाडसाचे इतर सहप्रवासी आणि पोलिसांनीही कौतुक केले. ते गुन्हेगार वृत्तीचे फटका टोळीचे सदस्य एकत्रितपणे आपणास गाठुन मारहाण करतील, असा कोणताही विचार उडी मारताना तरूणाने केला नाही. या मोबाईल चोरीप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आटकवडे गावाचा महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला विद्यार्थी परमानंद शांताराम आव्हाड (२१) याने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
काय घडली घटना
परमानंदचा एक मित्र मुंबईत घाटकोपर येथे रहातो. त्याचा मंगळवारी वाढदिवस होता. आपल्या मित्राचा वाढदिवस असल्याने परमानंद मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सिन्नर येथून नाशिक रोड रेल्वे स्थानकात आला. या रेल्वे स्थानकातून राज्यराणी एक्सप्रेसने त्याने मुंबईचा प्रवास सुरू केला. कल्याणला उतरायचे असल्याने टिटवाळा रेल्वे स्थानकानंतर परमानंद एक्सप्रेसच्या दारात आला. त्याच्या हातात मोबाईल होता. आंबिवली जवळ फटका टोळी सक्रिय असते. ती मोबाईल चोरी करते याची माहिती नसल्याने परमानंद निर्धास्तपणे हातात मोबाईल घेऊन एक्सप्रेस दारात उभा होता.
आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचा वेग मंदावला. त्यावेळी रेल्वे मार्गाजवळ रेल्वे उड्डाण पुलाखाली तीन १८ वर्षाचे तरूण घुटमळत होते. ते रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उभे असतील असे परमानंदला वाटले. तेवढ्यात फटका टोळीच्या एका गुंडाने हातामधील काठीचा फटका जोराने परमानंद याच्या हातावर मारला.
बेसावध असलेल्या परमानंदच्या हातामधील मोबाईल रेल्वे मार्गाच्या बाजुला पडला. तेवढ्यात त्या तीन गुंडामधील एकाने मोबाईल उचलला. ते तिघेही पळून जाऊ लागले. परमानंद चोर चोर म्हणून मोठ्याने ओरडत होता. तो एक्सप्रेसच्या दारात उभा होता. पुढे गेल्यावर एक्सप्रेसचा वेग एकदम मंदावल्याने परमानंद याने एक्सप्रेसमधून रेल्वे मार्गाच्या बाजुला उडी मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका टोळीच्या तिन्ही चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत ते तिन्ही चोरटे रस्त्यावर उभी केलेल्या एका दुचाकीवर (एमएच-०५-जीजी-१९१६) बसून पळून गेले.
या चोरट्यांच्या मागे पळताना पाय मुरगळल्याने आणि हाताला काठीचा जोराचा फटका बसल्याने परमानंदने हताशपणे तेथेच थांबून रिक्षा पकडली. आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन फटका टोळीच्या चोरट्या विरूध्द तक्रार केली. पोलिसांनी
गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मागील अनेक वर्षापासून फटका टोळी आंबिवली, शहाड रेल्वे स्थानक भागात सक्रिय आहे. या टोळीचे अनेक चोर सदस्य रेल्वे पोलिसांनी पकडले आहेत. जामिनावर बाहेर आले की ते पुन्हा आपला चोरीचा धंदा सुरू करतात, अशी माहिती आहे.
