ठाणे : रुग्णवाहिकांचे दरपत्रक जाहिर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येताच, परिवहन विभागाचे सह आयुक्त संदेश चव्हाण यांनी या दरपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच रुग्णवाहिकांचे निश्चित दरपत्रक रुग्णालयांच्या गेटवर तसेच प्रत्येक रुग्णवाहिकेच्या आत प्रदर्शित करणे बंधनकारक केले असून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. यामुळे काही रुग्णवाहिकाचालकांकडून होणारी लुटमार थांबून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

रुग्णवाहिका चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जात असून यामुळे रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाची आर्थिक पिळवणुक होते. यासंबंधीच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाकडेही येत होत्या. दरम्यान, या प्रकाराला आळा बसावा यासाठी रुग्णवाहिकांचे दरपत्रक जाहीर करावे अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव नैनेश पाटणकर यांनी केली होती. यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने रुग्णवाहीकांचे दरपत्रक जाहीर केले होते. त्याच्या अंमबजावणीसाठी ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी पत्रकही काढले होते. परंतु त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नव्हती.

रुग्णवाहिकांचे निश्चित दरपत्रक रुग्णालयांच्या गेटवर तसेच प्रत्येक रुग्णवाहिकेच्या आत प्रदर्शित करणे बंधनकारक असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले होते. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. तसेच याप्रकरणी मनसेचे पाटणकर यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाचे सह आयुक्त संदेश चव्हाण यांनी एक परिपत्रक काढले आहे. त्यात सर्व रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालक-मालकांना तातडीने सूचना देत दरपत्रक स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना माहिती मिळावी यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्येही दरपत्रक प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णवाहीका दरपत्रक

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने १९ जून २०२० रोजीच्या बैठकीत रुग्णवाहिकांचे दर निश्चित केले होते. त्यानुसार मारुती व्हॅनसाठी २५ किमी किंवा २ तासांसाठी ७०० रुपये, टाटा सुमो किंवा मॅटॅडोर प्रकारासाठी ८४० रुपये, टाटा ४०७ किंवा स्वराज माजदा प्रकारासाठी ९८० रुपये तर आयसीयू किंवा एसी रुग्णवाहिकेसाठी ११९० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. २५ किमी किंवा २ तासांनंतर अनुक्रमे १४ ते २४ रुपये प्रति किमी दर लागू होणार आहे. याशिवाय पहिल्या एका तासाची प्रतीक्षा विनामूल्य ठेवण्यात आली असून त्यानंतर प्रत्येक तासाला ५० रुपये शुल्क आकारले जाईल. निश्चित दरापेक्षा जास्त भाडे आकारण्यास मनाई करण्यात आली आहे.