कल्याण : पुणे येथील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेवरून काढण्यात आली. या विषयावर भाजपने तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करून निदर्शने केली होती. त्यानंतर बुधवारी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महासभेत अमित ठाकरे यांचा मुद्दा भाजपने महासभेत उपस्थित करून त्यांच्या कृतीचा निषेध केला. त्यासाठी महासभा दिवसभर तहकूब करण्याची मागणी केली. त्यावर महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी तहकुबीची घोषणा केली.

भाजपचे गटनेते नगरसेवक शशिकांत कांबळे यांनी महासभा तहकुबीची मागणी केली. देशाच्या सर्वोच्च नेत्याचा अवमान करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.

तहकुबीच्या मागणीनंतर शिंदे शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेले मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, गणेश लांडगे व इतर नगरसेवकांनी तातडीने उभे राहून बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभागृह नेत्यांनी तहकुबीला अनुमती दिली. त्यावर नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, गणेश लांडगे यांनी आम्हाला बोलू द्या, अशी मागणी सुरू ठेवली. ती विचारात न घेता राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

सत्तेत असूनही मनसेचा काटा

कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्तेत शिंदे शिवसेना, भाजप हे पक्ष आहेत. शिंदे शिवसेनेच्या पक्षात शिवशाही गटात मनसेचे नगरसेवक सहभागी आहेत. त्यामुळे मनसेचे स्वतंत्र अस्तित्व नाही. शिंदे शिवसेना सभागृहात बोलेल, निर्णय घेईल त्याप्रमाणे मनसेच्या नेत्यांना पाळावे लागते. त्याचा मोठा फटका आता मनसेला बसत आहे. भाजप द्वेषातून मनसेच्या स्थानिक नेत्यांनी हा दावणीला जाण्याचा घेतलेला निर्णय मनसेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पटलेला नाही. मनसेचे संत साहित्याचे अभ्यासक, अध्यात्मिक प्रल्हाद म्हात्रे, गणेश लांडगे हे अभ्यासू नगरसेवक आहेत. शिंदे शिवसेनेच्या खनपटीला असल्याने त्यांना सभागृहात स्वतंत्रपणे विषय मांडताना आता अडचण येत आहे.

परिवहन समितीत असताना प्रल्हाद म्हात्रे यांनी परिवहन समितीला, व्यवस्थापनाला सात वर्षांपूर्वी जेरीस आणले होते. बोलणे, मत मांडण्याची ताकद असताना आता सभागृहात मते मांडताना कोंडी होऊ लागल्याने मनसेचे नगरसेवक इतर विरोधी पक्षांकडून लक्ष्य होऊ लागले आहेत.

‘त्यात चुकले काय?

मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितले, हे सगळे ढोंग आहे. यांना (भाजप) सत्तेत राहयचे आहे व वरिष्ठांना पण दाखवायेच आहे. सगळे ठरलेले आहे. सभा तहकुबीवर मत मांडण्यास आपण दोन वेळा उभा राहिलो. पण आपणास बोलू दिले नाही. सभागृह नेत्यांनी अगोदरच मंजुरी कशी दिली. महापुरूषांच्या रांगेत पंतप्रधानांची प्रतिमा नसावी, ही मनसेचे नेते राज ठाकरेंची भूमिका आहे. त्यात चुकले काय. आम्ही सत्तेत आहोतच. याउलट हेच (भाजप) सत्तेत वाटा घ्यायला आले आहेत. अन्यथा यांची यांची अवस्था खूप बिकट झाली असती, असे म्हात्रे म्हणाले.

उद्धव ठाकरे गटाची टीका

उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक संकेश भोईर यांनी सांगितले, की महिन्यातून एकदा होणारी महासभा तहकूब केली गेल्याने नागरी प्रश्न सभागृहात मांडता येत नाहीत. सभा काही वेळ तहकूब केली असती तर ठीक. पण ती पूर्ण वेळ तहकूब करण्यात मनसेचे नगरसेवकांनी या तहकुबीला विरोध केला नाही. ते पण यात सामील होते, अशी टीका भोईर यांनी केली. तर काँग्रसेच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी सांगितले, की महासभा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. पण येथे सत्तेचा खेळ सुरू आहे. भाजपने ही नाटके बंद करावीत. अन्यथा सत्तेतून बाहेर पडावे. सत्तेच्या या खेळामुळे जनतेचे प्रश्न लांबणीवर पडत आहेत.