ठाणे – अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स (AMR) ही समस्या सध्या जागतिक स्तरावर गंभीर स्वरूप धारण करत असून, तिचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील रुग्णालये आणि क्लिनिक यांनी एकत्र येत AMR विरोधात ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘आरनिसर्ग फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर AMR जनजागृती आणि सुरक्षित औषध व्यवस्थापन अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्सला २१व्या शतकातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्यधोक्यांपैकी एक म्हणून अधोरेखित केले आहे. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस आणि परजीवी यांसारखे सूक्ष्मजीव औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करू लागल्याने, पूर्वी प्रभावी ठरणारी अँटीबायोटिक्स हळूहळू निष्प्रभ ठरत आहेत. त्यामुळे सध्या संसर्गांवरही उपचार करणे कठीण बनत असून, रुग्णांना दीर्घकाळ रुग्णालयात दाखल राहावे लागते. परिणामी उपचार खर्च वाढणे, गुंतागुंत वाढणे आणि मृत्यूदरातही वाढ होण्याचा धोका निर्माण होतो.

डॉक्टरांचे मत

अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती सामाजिक पातळीवरही वाढणारे मोठे संकट आहे. डॉक्टरांनी दिलेला अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण न करणे, स्वतःहून औषधे घेणे, उरलेली औषधे इतरांना देणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे या गोष्टींमुळे औषध-प्रतिरोधक जीवाणूंचा प्रसार वेगाने होतो.

Award Banner

कालबाह्य औषधांसाठी ‘मेडिसिन टेक-बॅक बिन्स’ संकल्पना

या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आरनिसर्ग फाउंडेशनने आरोग्य संस्थांसाठी एक सर्वसमावेशक AMR जनजागृती टूलकिट विकसित केले आहे. या टूलकिटच्या माध्यमातून रुग्णालयांमधील डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी माहितीपर साहित्य उपलब्ध करून देऊन योग्य औषध वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

याशिवाय, वापरात नसलेल्या किंवा कालबाह्य औषधांच्या सुरक्षित निपटाऱ्यासाठी ‘मेडिसिन टेक-बॅक बिन्स’ ही संकल्पना राबवली जात आहे. अनेकदा घरात उरलेली औषधे कचऱ्यात किंवा नाल्यात टाकली जातात, ज्यामुळे पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो आणि औषध-प्रतिरोध वाढण्यास हातभार लागतो. या बिन्समुळे नागरिकांना अशा औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची सुविधा मिळणार आहे.
ठाण्यातील आठ रुग्णालये उपक्रमात

या उपक्रमाला ठाणे शहरातील आठ प्रमुख रुग्णालये आणि क्लिनिकचा प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल, सेन्सेस आय अँड ईएनटी हॉस्पिटल, आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीसीयू, डॉ. केळशीकर हॉस्पिटल, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल, चंद्रा क्लिनिक, डाकी पॉलिक्लिनिक आणि धन्वंतरी क्लिनिक यांचा समावेश आहे. या सर्व संस्थांमार्फत शहरात AMR संदर्भातील जनजागृती अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना आरनिसर्ग फाउंडेशनच्या सहसंस्थापिका डॉ. लता घनशामनानी आणि डॉ. लीना केळशीकर यांनी सांगितले की, अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती सामाजिक पातळीवर वाढणारे मोठे संकट आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून या समस्येची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.

नागरिकांनी अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे आणि उरलेली औषधे सुरक्षितपणे जमा करणे या सवयी आत्मसात केल्यास AMR चा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आरनिसर्ग फाउंडेशनने रुग्णालये, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक रुग्णालयांनी ghp@rnisargfoundation.com या ईमेलवर किंवा 9321197375 / 9323783266 या क्रमांकावर संपर्क साधावा.