“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी”

२६ ऑगस्ट २००१ रोजी याच गाडीमधून प्रवास करताना आनंद दिघेंचा ठाण्यातील वंदना टॉकिजसमोरच्या रस्त्यावर भीषण अपघात झाला.

anand dighe
आज आनंद दिघेंची जयंती असून याच निमित्ताने समोर आला हा किस्सा (फोटो फेसबुकवरुन साभार)

– किशोर कोकणे
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आजपासून त्यांनी वापरलेल्या कारची डागडुजी करुन तिला नवसंजीवनी देण्यात आलीय. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: खारटन रोडवरील शक्तीस्थळ येथे जाऊन या गाडीची पाहणी केली. शिवसेनेकडून आज ठाण्यात मोठ्या प्रमाणात आनंद दिघेंची जयंती साजरी केली जात आहे. यंदाच्या जयंतीमध्ये आनंद दिघेंची ही गाडी खास चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच आनंद दिघेंच्या गाडीचे चालक असणाऱ्या गिरीश शिलोत्री यांनी या गाडीसंदर्भातील आठवणी जागवताना एक रंजक किस्सा प्रसारमाध्यमांसोबत शेअर केलाय.

आनंद दिघे शहरातील शिवसेनेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये फिरण्यासाठी हीच गाडी वापरत होते असं शिलोत्री म्हणाले. त्यावेळी ठाणे जिल्हा एकच होता. डहाणू लोकसभा मतदारसंघ अगदी इगतपुरीपर्यंत पसरला होता. आनंद दिघे याच गाडीमधून संपूर्ण जिल्हा त्यावेळी पिंजून काढायचे, असं शिलोत्री म्हणाले. तसेच एकदा या गाडीमधून जात असताना मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या काही गुंडांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामधून आनंद दिघे या गाडीच्या मदतीने कसे वाचले याचा किस्साही शिलोत्री यांनी सांगितला.

“१९९८ साली ही गाडी आम्ही वर्गणी काढून घेतली होती. २००१ साली (आनंद दिघे) साहेब गेले. या गाडीतून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. तेव्हा ठाणे जिल्हा एकच होता. डहाणू लोकसभा हा इगतपुरीपर्यंत होता,” असं शिलोत्री म्हणाले. “आम्ही मीरा रोडला एका पुजेसाठी जात होतो. दाऊद गँगच्या लोकांनी आमचा पाठलाग केला होता. शेवटी नाइलाजाने मला गाडी मीरा रोड पोलीस स्थानकामध्ये घुसवावी लागली. मी साहेबांचा जीव वाचवला,” असं शिलोत्री म्हणाले.

या अर्माडा प्रकारातील गाडीने साहेबांना फार साथ दिली, अशा शब्दांमध्ये शिलोत्रींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. २६ ऑगस्ट २००१ रोजी याच गाडीमधून प्रवास करताना आनंद दिघेंचा ठाण्यातील वंदना टॉकिजसमोरच्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. याच अपघातमध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आनंद दिघेंची हीच गाडी आता पुन्हा नव्याने दुरूस्ती करून तयार करण्यात आली आहे. या गाडीची एकनाथ शिंदे यांनीही पाहणी केलीय. अभिषेक चव्हाण, विनायक नर, योगेश बनसोडे यांनी या गाडीला नवसंजीवनी दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand dighe driver take his car to mira road police station when dawood gang was fallowing them tlsp0122 scsg

Next Story
भारतमातेच्या पूजेला विरोध करत फोटो हिसकावून घेत महिलेकडून सुरक्षारक्षकांना मारहाण; अनेकांचे मोबाईल फोडले
फोटो गॅलरी