कल्याण – बकरी ईदच्या दिवशी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीचे मंदिर हिंदू भक्तांना कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलिसांकडून बंद ठेवले जाते. देशात, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. तरीही बकरी ईदच्या दिवशी मंदिर खुले ठेवण्यात येत नाही. हे खेदजनक आहे. अशाप्रकारे हे मंदिर खुले करावे म्हणून मागील ३० वर्षांपासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथे बकरी ईदच्या दिवशी घंटानाद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनातील काही जण आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले पण, कोणी या घंटानाद आंदोलनाला न्याय मिळून देऊ शकले नाही, अशी खंत व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिर बंद ठेवण्याविषयीची निर्बंध उठवावेत. तसेच, मंदिर बंद ठेवण्याची प्रथा बंद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रमुख नेते आपण आहात. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या जनतेचा विश्वास संपादन करून आपण राज्यात सत्ता मिळवली आहे. अशावेळी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिर ईदच्या दिवशी सुरू ठेवा म्हणून हिंदूंना संघर्ष करावा लागतो हे खूप खेदजनक आहे. इतर कोणत्याही धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांवर असे निर्बंध लादले जात नाहीत. मग हिंदू भाविकांच्या मूलभुत अधिकारांवर गदा का आणली जात आहे, असा प्रश्न उपनेते साळवी यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
दिवंगत आनंद दिघे यांनी हिंदुंच्या धार्मिक भावनांचा विचार करून दुर्गाडी किल्लाजवळ घंटानाद आंदोलन सुरू केले. हजारो शिवसैनिक ३० वर्ष या आंदोलनात सहभागी होत आहेत. सरकारे बदलली, पदे बदलली पण कल्याणमधील हिंदू भाविकांवरील अन्याय कायम राहिला, अशी भावना साळवी यांनी पत्रात व्यक्त केली केली आहे. ईदच्या दिवशी दुर्गाडी मंदिर परिसरातील सर्व निर्बंध तात्काळ हटवावेत. या दिवशी हिंदू भाविकांना कोणत्याही अडथळ्याविना देवीचे दर्शन घेता यावे. घंटानाद, आरती इतर धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध तात्काळ हटवावेत, अशी मागणी साळवी यांनी केली आहे.
नेत्यांना चिमटे
या घंटानाद आंदोलनात सहभागी होऊन काही जण आमदार, नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी दुर्गाडी मुक्तीच्या मोठ्या घोषणा पदावर असताना केल्या. पण, त्यांच्या घोषणा घोषणाच राहिल्या आहेत. सामान्य शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरावरील दर्शनासाठी ईदच्या दिवशी आजही आंदोलन करत आहे. हे सर्व पाहून आनंद दिघेही स्वर्गातून पश्चातापाने म्हणत असतील ३० वर्षापूर्वी आपण सुरू केलेल्या घंटानाद आंदोलनाला अद्याप न्याय मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा केली. भाजपा नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन देत रस्त्यावरील नमाज पठण थांबवावे. तसेच दुर्गाडी मंदिरावरील प्रवेशबंदी हटवावी, अन्यथा बकरी ईदच्या दिवशी हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
