कल्याण – शासनाच्या धर्मवीर आनंद दिघे मीटर टॅक्सी रिक्षा विकास महामंडळाचा सदस्य असलेल्या, ६५ वर्ष पूर्ण केलेल्या कल्याण, डोंबिवली, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ या कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातील ४७ रिक्षा चालकांना सन्मान निधीचा लाभ जाहीर झाला आहे. या रिक्षा चालकांच्या बँक खात्यात थेट महामंडळाकडून १० हजार रूपये जमा होणार आहेत. अनेक वर्षानंतर प्रथमच रिक्षा चालकांसाठी शासनाने या महामंडळाच्या माध्यमातून ही लाभ सेवा सुरू केल्याने रिक्षा चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रिक्षा चालक हा आयुष्यभर प्रवासी सेवा देत असतो. विशिष्ट वयोमानानंतर रिक्षा चालकाला प्रवासी वाहतूक देताना शरीर प्रकृतीचा विचार, वयाचा विचार करून बंधने येतात. त्यामुळे रिक्षा चालकांसाठी शासनाने सेवा निवृत्ती वेतन सुरू करावे. रिक्षा चालकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना आरोग्य विम्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रिक्षा चालकांच्या घरांचा प्रश्न गंभीर आहे. आयुष्यभर रिक्षा व्यवसाय करूनही तुटपुंज्या पुंजीमुळे तो घर घेऊ शकत
नाही. त्यामुळे रिक्षा चालकांसाठी विशेष घरांची योजना राबवावी अशी रिक्षा संघटनांची मागणी होती. या सर्व प्रश्नांचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धर्मवारी आनंद दिघे मीटर टॅक्सी रिक्षा विकास महामंडळ शासनाने स्थापन केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या महामंडळाचा कारभार सुरू आहे.
रिक्षा चालकांना लाभ
ज्या रिक्षा चालकांनी वयाची ६५ वर्ष पूर्ण केली आहेत. आणि ज्या रिक्षा चालकांनी १ मे २०२६ पूर्वी ऑनलाईन माध्यमातून आपले सभासदत्व अर्ज धर्मवीर आनंद दिघे महामंडळाच्या संकेतस्थाळावर भरून पाठविले आहेत. अशा पात्र रिक्षा चालकांना शासनाने आनंद दिघे कल्याण महामंडळाच्या माध्यमातून १० हजार रूपयांचा सन्मान निधी जाहीर केला आहे. अशा पात्र लाभार्थींमध्ये कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातील डोंबिवली, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ भागातील एकूण ४७ रिक्षा चालकांचा समावशे आहे. त्यांना शासनाने १० हजार रूपयांचा सन्मान जाहीर केला आहे. हा निधी या रिक्षा चालकांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. पात्र लाभार्थीमध्ये एका महिला रिक्षा चालकाचा समावेश आहे.
पात्र रिक्षा चालकांची नावे
नंदकुमार कुलकर्णी, चंद्रकांत भोईर, श्याम दिनकर, यशवंत मिरकुटे, राम सिंग, चंद्रकांत शर्मा, प्रकाश बेहरानी, रंगनाथ कानसे, सुभाष आंबले, मुरली मेथानी, रामभरण मौर्या, अनिल म्हात्रे, प्रेमचंद पांडे, दिलीप चित्तम, सुरेश पारवानी, अब्दुल कुरेशी, बशवंत मुळे, रामप्यारे निर्मल, फारूक खोत, रहमाताली मोहम्मद, दीपेंद्र धोत्रे, प्रकाश शेट्टी, रामचंद्र म्हात्रे, अब्दुल रशिद शेख, अशोक धनगर, अस्मत मुल्ला, शिवाजी पाटील, विनोद चव्हाण, विनोद राणे, गजानन तेरेदेसाई, विजय बनसोडे, राजेंद्र कामाठी, पुरन अलवानी, अशोक गधे,अशोक शेलार, ज्ञानेश्वर कदम, माया पाटील, प्रदीप दलाल, रमेश घाग, रोहिदास भोईर, विश्वनाथ वाकले, गुंडप्पा बोडके, कुतुबुद्दिन शेख, सुधाकर ठाकरे, द्वारकाप्रसाद चिचोले, राजेंद्र जोशी, घनश्याम बाविस्कर, सिताराम तांबे.
धर्मवीर आनंद दिघे मीटर टॅक्सी रिक्षा विकास महामंडळातील ज्या सदस्यांनी वयाची ६५ वर्ष पूर्ण केली आहेत. अशा पात्र लाभार्थींनी शासनाने त्यांच्या खात्यात थेट १० हजार रूपये सन्मान निधी वर्ग करण्याची तजविज केली आहे. राज्यात प्रथमच रिक्षा चालकांसाठी अशाप्रकारचा उपक्रम शासनाकडून सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे यात मोठे योगदान आहे. – सुरेश नवले कार्याध्यक्ष, रिक्षा चालक मालक असोसिएशन, कल्याण शहर.
