ठाणे : प्रत्येक निवडणुकीत सर्व जागा आपणच लढविल्या पाहिजेत व जिंकल्या पाहिजेत, या भावनेला भाजपने मुरड घातली पाहिजे. शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा जगातील, भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाने आत्मचिंतन करणे अधिक संयुक्तिक ठरेल, असा टोला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी भाजपला लगावला. महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा अधिक चांगला समन्वय कसा साधता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने पुढाकार घ्यायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीत महायुतीला धक्का बसल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय असता, तर पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असते, असे परांजपे म्हणाले.

पुण्यातील एक जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी पहिल्या दिवसापासून आमचा आग्रह होता. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता, असे त्यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली असताना शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवथान बन यांनी केला होता.

या आरोपांना प्रत्युत्तर देताना परांजपे यांनी भाजपच्या आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचे आमदार प्रशांत बंब व इतर आमदारांनी कोणासाठी काम केले, याचाही शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. अमरावतीत शिवसेना जागा लढवत असतानाही भाजपचे बंडखोर उमेदवार प्रचार करत होते. मात्र, यावरून आम्ही भाजपवर आरोप करणार नाही. नागपूरमध्ये भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महायुतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत चांगला समन्वय राखण्याची जबाबदारी भाजपची आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व जागा आपणच लढवाव्यात व जिंकाव्यात, अशी भूमिका घेणे योग्य नाही. मित्रपक्षांना योग्य सन्मान, वागणूक व निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व देण्याचे मोठ्या भावाचे मन भाजपने दाखविल्यास महायुतीला प्रत्येक निवडणुकीत यश मिळू शकते. शिवसेनेकडून कधीही वाद निर्माण करण्यात आलेला नाही, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले.

‘अभद्र भाषा सहन करणार नाही’

शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांकडून अभद्र भाषा वापरली गेल्यास किंवा आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला. तसेच, शिवसेनेची सहानुभूती प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.