मुंबई: राजकारणात कोणीही अनंत काळाचा मित्र नसतो की शत्रू नसतो. असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय आज आला. एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करणारे, शिंदे यांच्यावर मनसोक्त तोंडसुख घेणारे. एकनाथ शिंदे यांच्याकडून घोर अपमान सहन करणारे आनंद परांजपे अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यांना एखादे महामंडळ किंवा भविष्यात ठाण्यात तयार होणारा अतिरिक्त लोकसभा मतदारसंघ दिला जाणार आहे. त्या परांजपे यांचा राजकीय प्रवास वाचा. शिवसेनेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुन्हा शिवसेनेत येऊन थांबला आहे. हा ३६० डिग्री प्रवास कसा झाला ते पाहूया.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या मागे पुढे फिरावे लागते. ते घालून पाडून बोलतात. खासदाराला कार्यकर्त्याएवढादेखील सन्मान दिला जात नाही. राहुल गांधी, राज ठाकरे या नेत्यांना भेटल्यामुळे संशय घेतला गेला. पक्ष सोडणार आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. असे आरोप करुन शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे माजी खासदार आनंद परांजपे यांनी अखेर १२ वर्षांनंतर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत (२००८) त्यांचे चिंरजीव आनंद परांजपे पहिल्यांदा खासदार झाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ मध्ये ते कल्याण लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झाले. तू आमच्यामुळे निवडून आलास. तुला चार लोक पण ओळखत नाहीत, असे टोले चार चौघात मारले जात होते. हा अपमान असाह्य झाल्याने परांजपे यांनी एका मुलाखतीत कॅमेरासमोर अश्रूंना वाट करुन दिली होती.

शिवसेनेत अपमान असाह्य झाल्याने २०१४ मधील लोकसभा निवडणुकीअगोदर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. शरद पवार यांनी त्यांच्यावर अनेक पदांची जबाबदारी दिली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांचा हात सोडून २०२३ मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर चढविले. अजित पवार यांचे निधन होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच परांजपे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ उतरवून पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीत खासदारकी वा आमदारकी न मिळाल्याने ते नाराज होते. अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ज्या शिंदेवर आरोप करुन परांजपे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्याच शिंदे यांच्या पक्षात परांजपे यांना प्रवेश करण्याची वेळ आली. त्यांना भविष्यात ठाण्यात वाढणाऱ्या लोकसभा मतदारसंघात संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.