Anand Paranjpe unhappy with NCP Ajit Pawar group over MLC ticket: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते, व पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचे नाव विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावलले आहे. यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, परांजपे यांनी मात्र असे काहीच नसल्याचे सांगत या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारी साठी इच्छुक असतानाही आनंद परांजपे यांना पक्षाने डावलले. असे असतानाच आता विधान परिषद उमेदवारीत त्यांचे नाव आघाडीवर होते. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने परांजपे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

पक्षाकडून सातत्याने डावलले जात असल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याने बोलले जात असून त्यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आनंद परांजपे कोण आहेत ?

राजकीय चढ-उतारांचा सामना करत स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आनंद परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. आनंद परांजपे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. सुरवातीला ते ठाण्याचे आणि

त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. पुढे पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली. त्यांनी राष्ट्रवादीत ठाणे-कल्याण भागात पक्ष संघटन उभारण्यावर भर दिला.

केवळ अफवा आहेत विधान परिषद उमेदवारी डावल्याने मी शिंदे सेनेत जाणार या केवळ अफवा आहेत. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत, त्यांची विविध कामानिमित्ताने भेट होत असते, त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.