ठाणे : सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानंतरही शहरातील भटक्या श्वानांची काळजी घेण्यात येत नसल्याच्या कारणास्तव राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माध्यमातून प्राणीप्रेमींनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची बुधवारी भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली. दरम्यान, प्राणी प्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

ठाणे महापालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. परंतु पालिकेकडून त्याचे पालन होत नसून या आदेशाचे पालन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरव राव यांची बुधवारी भेट घेतली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आरोग्य अधिकारी प्रसाद आणि पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर हे उपस्थित होते. ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याबाबत प्राणीप्रेमींनी आयुक्त राव यांच्याशी चर्चा केली.

ठाणे शहरात निर्बिजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येत आहे. मात्र, हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळे या श्वानांचे काय होत आहे, याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाही. वागळे इस्टेट भागात एक श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे. मात्र, त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु ठाणे महापालिकेने असे केंद्रच उभारलेले नाही. भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फिडींग सेंटर्स (अन्नछत्र) उभारलेले नाहीत. भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महापालिकेचे स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही, असा आरोप प्राणीप्रेमींनी केला.

नसबंदीचे प्रमाण वाढविले जात नसल्याने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाही. तसेच, श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच हे स्मशान उघडे असते. यामुळे या वेळेनंतर अचानक एखादे श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागत आहे. मंगळवारीच असा प्रकार घडला आहे. त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी दोन सत्रात चालवावी, अशी मागणी प्राणीप्रेमींनी आयुक्त राव यांच्याकडे केली. या बाबत अनुकूलता दर्शवत ठाण्यात दोन प्राणी आरोग्य केंद्र तसेच निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ठाण्यात कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती मनोज प्रधान यांनी दिली.