प्लास्टिकच्या पिशव्यांतून कलाकृती साकारण्याच्या ७५ वर्षीय आजींच्या उपक्रमातून पर्यावरणाला हातभार
एखादा दिवस परिचयाच्या व्यक्तींना भेटायचे निमित्त साधत त्यांच्या घरी जायचे.. तेथून प्लास्टिकच्या पिशव्या जमा करायच्या आणि त्यापासून आकर्षक कलाकृती बनवायची.. वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या कल्याणमधील अंजली आपटे यांचा हा दिनक्रम म्हटला तर छंद आहे. पण त्यांच्या या छंदाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात फेकल्या जाण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यातही हातभार लागला आहे. प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या बाबतीत देशात आघाडीवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीसाठी आपटे आजींनी गेल्या कित्येक वर्षांपासून जोपासलेला हा छंद पुरेसा नसला तरी त्यातून इतरांना प्लास्टिकमक्तीची प्रेरणा तरी मिळतेच मिळते.
बाजारात सामान खरेदी केल्यावर मिळणारी पिशवी घरात कचरा टाकण्यासाठी वापरली जाते. मात्र या पिशव्या विघटनशील नसल्याने पर्यावरणाला घातक ठरतात. यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारांनी कडक नियम केले असले तरी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नेमकी हीच बाब ओळखून अंजली आपटे यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांपासून वेगवेगळय़ा कलाकृती बनवण्याचा छंद जोपासला. त्यासाठी आप्तेष्ट, परिचित यांच्या घरी जाऊन त्या पिशव्या गोळा करतात. या पिशव्यांपासून आकर्षक चटया, फुले, महिलांच्या पर्स अशा गृहपयोगी वस्तू त्या तयार करतात. विशेष म्हणजे, आपला छंद स्वत:पुरता न ठेवता परिसरातील बचत गट चालवणाऱ्या महिलांना प्लास्टिकच्या पिशव्यांपासून चटई बनवण्याचे मोफत प्रशिक्षण त्या देतात. गरजू महिलांनी अंजली यांच्याकडून चटई बनवण्याचे शिक्षण घेत स्वत:चा रोजगार निर्माण केला आहे.
माहितीचे भांडार
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक विद्यार्थी माहितीच्या संकलनासाठी इंटरनेटचा वापर करतात. पण आपटे आजींकडे स्वत:चा असा माहिती कोश आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रे, मासिकांमध्ये प्रसिद्ध होणारे प्राण्यांविषयीच्या चार हजार लेखांचा जुना संग्रह त्यांच्याकडे आहे. ‘जंगल बुक’ नावाने त्यांनी तयार केलेला हा संग्रह तसेच प्राण्यांविषयीच्या वहीची नोंद लिम्का बुकमध्ये होण्याच्या मार्गावर आहे.
१९७० पासून वृत्तपत्रे, मासिकात छापून आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धाविषयी प्रसिद्ध झालेली माहिती अंजली आपटे यांनी संकलित केली आहे.