डोंंबिवली : मागील पंचविस वर्षाच्या कालावधीत वडिल दिवंगत वामन म्हात्रे यांनी बांधून ठेवलेल्या दोन भक्कम आपल्या हक्काच्या पालिका प्रभागांमध्ये आपणास उमेदवारी मिळते की नाही, असे वाटू लागल्याने अस्वस्थ झालेल्या शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल यांनी येत्या काळात संघर्ष करायचा आणि लढण्याची तयारी करायची, अशी पत्रकबाजी करून आगामी पालिका निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढणारच असे संकेत दिले.
डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी हे वामन म्हात्रे यांचे मागील पंचविस वर्षापासूनचे प्रभाग. या प्रभागांमध्ये वामन म्हात्रे यांचा बांधलेला हक्काचा मतदार आहे. महिला मंडळ, सार्वजनिक मित्र मंडळ अशा मंडळांच्या माध्यमातून मतदारांची एक मोठी फळी या प्रभागात आहे. आता आपल्या प्रभागात चार सदस्य प्रभाग पध्दतीत आपणास उमेदवारी मिळते की नाही असे वाटू लागल्याने अस्वस्थ झालेल्या अनमोल म्हात्रे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.
अनमोल म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन आपल्या घरात दोन जणांना पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. वामन म्हात्रे यांचे लहान बंधू बाळा म्हात्रे हे शिंदे शिवसेनेचे कट्टर समर्थक आहेत. ते वामन म्हात्रे यांनी बांधलेल्या प्रभागातून पालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. आगामी पालिका निवडणुकीसाठी बाळा म्हात्रे यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. चार सदस्य प्रभाग पध्दतीत विकास म्हात्रे, त्यांची पत्नी, बाळा म्हात्रे, संदेश पाटील असा गट तयार झाला तर या प्रभाग पध्दतीत आपणास स्थान मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने आतापर्यंत विकास म्हात्रे, बाळा म्हात्रे, संदेश पाटील यांच्या व्यासपीठावर दिसणाऱ्या अनमोल वामन म्हात्रे यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी बंडाचे निशाण फडकवले आहे.
‘माझ्या वडिलांनी राजकारणा बरोबर अधिक प्रमाणात सामाजिक भावनेतून लोकसेवा केली. प्रभागात विकास कामे केली. संघर्ष ,लढवय्या भूमिका घेऊन प्रसंगी दोन हात करून विकास कामे मार्गी लावून घेतली. त्यामुळे तोच वारसा आम्ही पुढे चालविणार आहोत. तो वारसा अजून थांबलेला नाही. तो आता आपल्या रूपाने पुन्हा जीवंत झाला आहे,’ असा भावनिक मजकूर अनमोल म्हात्रे यांनी प्रसिध्द करून आपल्या प्रभागातील मतदारांना साद घातली आहे. आणि आगामी पालिका निवडणुकीसाठी मी कोठेही असेन, पण आपण आमच्या माझ्या सोबत राहा, असे आर्जव केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनमोल म्हात्रे यांना शिंदे शिवसेनेकडून पक्षात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर भाजपने अनमोल यांना थांबा आणि वाट पाहाचा सल्ला देऊन त्यांच्यासाठी दरवाजे किलकिले करून ठेवले आहेत.
