चार हजारहून अधिक रुग्णांवर उपचार

डोंबिवली :  निसर्ग, तौक्ते भयावह चक्रीवादळे, मुसळधार पाऊस आणि महापुराची सर्वदूर परिस्थिती असताना मोकळ्या मैदानात असलेल्या डोंबिवली जिमखाना येथील करोना काळजी आणि उपचार केंद्र या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीला समर्थपणे तोंड देत रुग्ण सेवेत व्यस्त होते. गेल्या वर्षभराच्या कालावधीत सुमारे चार हजार करोना रुग्णांची सेवा या केंद्राने केली. तीन हजार ५०० हून अधिक रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले. अत्याधुनिक वैद्यकीय सेवासुविधांनी सज्ज या करोना उपचार केंद्रात सद्यस्थितीत ७६ करोना रुग्ण उपचार घेत आहेत.

या केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा  पालिकेतर्फे लकरच होणार आहे. या केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरांसह परिचारिका, अन्य कर्मचारी, पालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.  या ठिकाणी १२० रुग्णशय्या, १०० हून अधिक कृत्रिम श्वसन यंत्रणेची रुग्णशय्या, १० डायलेसिस रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली. सहा महिन्यात महामारी आटोक्यात येईल, असा अंदाज करून जून ते नोव्हेंबपर्यंत हे केंद्र सुरू ठेवण्याचा विचार प्रशासनाचा होता. त्यानंतर हे केंद्र बंद करण्यात येणार होते. नंतरच्या काळात कल्याण, डोंबिवलीत करोना रुग्णसंख्या शिखरावर पोहचली. ऑक्सिजन शय्यांची कमतरता भासू लागली. जिमखाना केंद्र पुढे चालू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, असे डोंबिवली जिमखाना केंद्राच्या हॉस्पिटल व्यवस्थापक आणि पालिकेच्या उपअभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.

करोनाने अतिगंभीर रुग्ण या केंद्रात दाखल केले जात होते. सुमारे ३०० हून अधिक करोना रुग्णांचा या केंद्रात मृत्यू झाला. येथील अद्ययावत वैद्यकीय सुविधा, तत्पर वैद्यकीय सेवांमुळे स्थानिक करोना रुग्णांना येथे उपचार मिळाले. तंत्रशुद्ध पद्धतीमुळे केंद्रातील एकही डॉक्टर, परिचारिका, येथे सेवा देणारे पालिका अधिकारी, कर्मचारी करोनाने बाधित झाला नाही.

सुसज्ज रुग्णालयासाठी डोंबिवली जिमखान्याची मैदानाचा पाया भक्कम असलेली, टेनिस कोर्टाची जागा पालिकेला उपलब्ध झाली. आयुक्तांच्या पुढाकाराने जिमखान्याने पूर्ण सहकार्य केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णांना सोयीचे पडेल, असे जिमखाना केंद्र सुरू झाले. या केंद्राची उभारणी भक्कम केली असल्याने वर्षभर सर्व प्रकारच्या नैसर्गिक आव्हानांना या केंद्राने तोंड दिले.

– सपना कोळी, शहर अभियंता