आणखी ९८ गावे ‘एमएमआरडीए’त?

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्’ाांतील एकूण ९८ गावांचा समावेश एमएमआरडीएमध्ये करण्यात येणार आहे.

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ांतील सहा तालुक्यांतील भागासाठी प्रस्ताव; ‘नैना’तील काही भागाचाही समावेश

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे : द्रुतगती रेल्वे प्रकल्प, मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखे प्रकल्प सुरू असलेल्या परिसरांचा विकास जलदगतीने होत असताना या भागांमधील पायाभूत सुविधांसह रोजगार निर्मितीच्या स्रोतांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर सादर करण्यात आला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील एकूण ९८ गावांचा समावेश एमएमआरडीएमध्ये करण्यात येणार आहे. तसेच महामुंबई क्षेत्रातील सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या ‘नैना’ परिसराचा काही भागही यात समाविष्ट करण्यात येणार आहे.

मुंबई पारबंदर प्रकल्प प्रभाव क्षेत्र, पोयनाड, बोईसर, खारबाव, नेरळ परिसर आणि कर्जत तालुक्यातील काही गावांचा या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये नियोजनबद्ध विकास व्हावा. ही शहरे वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांनी एकमेकांना जोडली जावीत यासाठी एमएमआरडीएसह विविध शासकीय यंत्रणांनी गेल्या काही वर्षांत ठाणे, रायगड तसेच पालघर जिल्ह्य़ात अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. यात मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या भागांचा विकास होत असताना तेथील पायाभूत सुविधा तसेच रोजगारनिर्मिती केंद्रांचीही आखणी नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे. महापालिका अथवा नगरपालिका क्षेत्रांच्या हद्दीत नसलेल्या परिसरात नियोजनाअभावी अस्ताव्यस्त विकास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करण्याची गरज एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. त्यासाठीच या भागांचे नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारसमोर मांडण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 यापूर्वीच्या एमएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये आता अधिकच्या क्षेत्राची वाढ होणार आहे. हे क्षेत्र वाढत असताना आणखी सहा नवे विकास केंद्र विकसीत करण्याचा प्रस्तावही एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील मुंबई पारबंदर प्रकल्प प्रभाव क्षेत्र, पोयनाड, नेरळ आणि कर्जत परिसर, पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसर, ठाणे जिल्ह्यातील भिवंडीलगत असलेला खारबाव परिसर क्षेत्राचा यात समावेश होणार आहे.

आतापर्यंतची हद्दवाढ

शासनाने ९ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उत्तरेकडील विस्तारित क्षेत्रात पालघर जिल्हयातील वसई तालुक्यातील उर्वरित गावे व संपूर्ण पालघर तालुका असे १ हजार ९४९ चौरस किलोमीटरचे क्षेत्र नव्याने समाविष्ट केले होते. तर दक्षिणेकडील विस्तारित क्षेत्रात अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर या रायगड जिल्ह्यातील ४ तालुक्यांच्या उर्वरित भागाचा सुमारे ८ हजार ७४चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट केले होते. उत्तरेकडील विस्तारित क्षेत्रात समाविष्ट झालेला भाग शासनाने ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक योजनेमध्ये समाविष्ट केला आहे. यात योजनेमध्ये इतर विकास केंद्रांसह बोईसर तसेच उमरोळी-कोळगाव ही विकास केंद्रे म्हणून प्रस्तावित केली आहेत.

फायदा काय?

मुंबई महानगराच्या प्रदेशाचा समतोल विकास करण्यासाठी नवे भाग यात जोडणे आवश्यक आहे. त्यातून नव्या प्रदेशात नवनव्या पायाभूत सुविधा उभारणे सोपे होते. प्राधिकरणाकरणात प्रकल्पांकरिता महसुलाचे स्रोत उपलब्ध होतात. त्या त्या भागात सुनियोजित विकास होतो. महानगर प्रदेशात विकासाचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होते.

मुरबाड, शहापूर प्रतीक्षेत

मुंबई महानगर प्रदेशात अंबरनाथ, कल्याण, भिवंडी या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्यातील गावांचाही समावेश करावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र त्याचा अद्यापपर्यंत काही विचार करण्यात आलेला दिसत नाही. त्यामुळे या तालुक्यातील गांवांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Another villages mmrda ysh