कल्याण – कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी मधील औषध दुकानात एका चोरट्याने शनिवारी मध्यरात्री चोरी केली आहे.

माजी आमदार आप्पा शिंदे आणि त्यांचा नातेवाईक माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांचे कल्याण पूर्वेत कोळसेवाडीत लक्ष्मी औषध दुकान आहे. अनेक वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. या दुकानाला एक सुरक्षा रक्षक आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लक्ष्मी औषध दुकानाचा सुरक्षा रक्षक चेतन भारंबे (३९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

पोलिसांनी सांगितले, कोळसेवाडीमध्ये माजी आमदार आप्पा शिंदे आणि त्यांचा नातेवाईक नीलेश शिंदे यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. सकाळी साडे नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत दुकान सुरू असते. शनिवारी रात्री दहा वाजता दुकानातील कर्मचाऱ्यांनी दुकान बंद केले. या दुकानाचा सुरक्षा रक्षक काही कामानिमित्त त्या दिवशी रात्र पाळीसाठी दुकानावर सुरक्षा ठेवण्यासाठी आला नव्हता.

हेही वाचा >>>ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद

या संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्मी औषध दुकानाचे दर्शनी भागातील लोखंडी प्रवेशव्दार धारदार लोखंडी कटावणीने उघडले. दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील अकरा हजार रूपयांची रोख रक्कम घेऊन पलायन केले. चोरट्याने दुकानातील इतर सामानाची फेकाफेक केली होती. त्याच्या हाती महागडे काही लागले नाही.

पहाटेच्या सुमारास सुरक्षा रक्षक औषध दुकानाजवळ गस्त टाकण्यासाठी आला. त्यावेळी त्याला दुकानाचे प्रवेशव्दार तोडण्यात आले असल्याचे आणि उघडे असल्याचे दिसले. त्याने आतमध्ये पाहिले तर दुकानातील गल्ला खाली फेकून देण्यात आला होता.ही माहिती सुरक्षा रक्षक चेतन भारंबे यांनी दुकान मालक नीलेश शिंदे यांना दिली.ते तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी त्यांना दुकानात चोरट्याने चोरी केल्याचे दिसले. चेतन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. हवालदार के. एल. कदम तपास करत आहेत.