रस्त्यांवरच्या सशुल्क वाहनतळाला मंजुरी

उल्हासनगर शहरात खरेदीसाठी वाहने घेऊन येणाऱ्या ग्राहकांना आता नवा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

व्यापारी संघटनांचा विरोध, ग्राहकांवर भार पडण्याची भीती

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात खरेदीसाठी वाहने घेऊन येणाऱ्या ग्राहकांना आता नवा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. उल्हासनगर महापालिकेत शहरातील ७४ रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांसह ग्राहकांनाही दुकानासमोर गाडी उभे करण्याचे पैसे द्यावे लागणार  आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पालिकेने स्वत:चे वाहनतळ उभारून त्यात शुल्क  आकारणी करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

उल्हासनगर शहरात हजारो ग्राहक दररोज येत असतात. ग्राहक दुकानाच्या समोरच वाहने उभी करून खरेदीसाठी जात असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केल्याने अनेकदा शहरात कोंडी होत असते. या बेकायदा पार्किंगला आळा घालून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिकेने शहरातील ७४  रस्त्यांवर सशुल्क वाहनतळाचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या पालिकेच्या महासभेत मांडला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरातील ७४ रस्त्यांवर आता वाहने उभी करण्यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्याला शुल्क अदा करावे लागणार आहे. या माध्यमातून उल्हासनगर महापालिका प्रशासनाला दरमहा दीड कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळणार आहे. तसेच या प्रस्तावामुळे शहरातील कोंडी सोडविणे शक्य होईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरातील व्यापारी संघटनांनी या प्रस्तावाला विरोध सुरू केला आहे. शहरात वाहनतळ उभारण्यात अपयशी ठरलेल्या पालिकेने आता उत्पन्नासाठी रस्त्यांवरच्या वाहनालाही शुल्क लावण्याची तयारी केल्याची टीका उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली आहे. पालिकेने रस्त्यांवरून उत्पन्न मिळवण्याऐवजी बहुमजली वाहनतळ उभे करण्याचाही सल्ला छतलानी यांनी दिला आहे. या निर्णयास तीव्र विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

७४ रस्त्यांचा समावेश

शहरातल्या एका दुकानात दोन मालक आणि किमान तीन ते चार कामगार असतात. त्यामुळे दुकानदारांना एका वाहनासाठी यापुढे वर्षांपोटी अंदाजे साडेबारा हजार द्यावे लागणार आहे. त्यात ग्राहकांनाही आता हा भुर्दंड बसेल. परिणामी ग्राहकसंख्या रोडावण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक एकमध्ये १५, प्रभाग समिती दोनमध्ये १४, प्रभाग समिती तीन क्षेत्रात २२ आणि प्रभाग समिती चारच्या क्षेत्रात २३ रस्त्यांचा समावेश या वाहनतळाच्या प्रस्तावात करण्यात आला आहे.

शहरातल्या पार्किंगला शिस्त लावण्यासाठी हा प्रयत्न आहे. ग्राहकांना बराच वेळ कोंडीत अडकावे लागते. त्याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसतो. त्यासाठी ही योजना असून यातून पालिकेला उत्पन्नही मिळणार आहे. शहरातल्या वाहतुकीला याचा फायदा होईल.

– अशोक  नाईकवडे, उपायुक्त, उल्हासनगर महापालिका.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Approval paid parking roads ysh

Next Story
ठाणे पूर्वच्या सॅटीस प्रकल्पाला वेग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी